लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात लागणार १६ हजार कर्मचारी, तयारीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:05 PM2024-02-02T16:05:58+5:302024-02-02T16:06:32+5:30

जिल्ह्यात ३ हजार ३५९ मतदान केंद्र

16 thousand employees will be required in Kolhapur district for the Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात लागणार १६ हजार कर्मचारी, तयारीला वेग

लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात लागणार १६ हजार कर्मचारी, तयारीला वेग

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १६ हजार कर्मचारी लागणार आहेत. सध्या जिल्हा निवडणूक विभागाकडून कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना मतदार केंद्रनिहाय ड्युटी देण्यात येणार आहे. यासह निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्यांसाठी सध्या टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे.

लोकसभानिवडणूक या महिनाअखेरपर्यंत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक विभागाकडून देखील वेगाने कामकाज सुरू आहे. पाच वर्षातून एकदा होणाऱ्या या लोकशाहीच्या उत्सवासाठी गेली दोन महिने तयारी सुरू आहेच पण आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने व निवडणूक जाहीर व्हायला काहीच दिवस राहिल्याने निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे.

निवडणुकीसाठी महसूलसह सर्वच विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या निकषानुसार यादी तयार करण्यात आली आहे. आचारसंहिता जाहीर होताच त्यांना कामकाजाचे वाटप केले जाईल. मतदार संख्या व मतदान केंद्रांची संख्या बघता राखीव कर्मचाऱ्यांसह १६ हजार कर्मचारी लागतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात ३ हजार ३५९ मतदान केंद्र

जिल्ह्यातील अंतिम मतदार यादीनुसार ३१ लाखांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ही आकडेवारी पाहता सध्या ३ हजार ३५९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. एका केंद्रावर १५०० पेक्षा जास्त मतदार होत असतील तर नव्या मतदार केंद्राची शिफारस केली जाते.

पुरवणी यादी प्रसिद्ध होणार

निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध केली असली तरी निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपर्यंत मतदार याद्या अद्ययावत केल्या जातात. वाढलेल्या मतदारांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट होतात.

मतदारसंघ : मतदान केंद्र संख्या

  • हातकणंगले : १२०८
  • राधानगरी : ४२५
  • चंदगड : ३८०
  • करवीर : ३५६
  • कागल : ३५३
  • शाहुवाडी : ३३३
  • कोल्हापूर दक्षिण : ३२६
  • कोल्हापूर उत्तर : ३११
  • एकूण केंद्रे : ३ हजार ३५९

Web Title: 16 thousand employees will be required in Kolhapur district for the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.