महापौरांच्या स्वीय सहाय्यकाकडे दिली १६ हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 04:44 PM2017-05-30T16:44:12+5:302017-05-30T16:44:12+5:30

तृप्ती माळवी लाच प्रकरण : फिर्यादी संतोष पाटील यांची साक्ष

16 thousand rupees bribe to the Mayor's assistant assistant | महापौरांच्या स्वीय सहाय्यकाकडे दिली १६ हजाराची लाच

महापौरांच्या स्वीय सहाय्यकाकडे दिली १६ हजाराची लाच

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : कोल्हापूर महापालिकेच्या माजी महापौर तृप्ती माळवी यांचा खासगी स्विय सहाय्यक अश्विन मधुकर गडकरी याला १६ हजार रुपयांची लाच दिली अशी साक्ष फिर्यादी व शिवाजी पेठेतील संतोष हिंंदूराव पाटील (रा. १७१२ ए वॉर्ड, ताराबाई रोड, माळी गल्ली, कोल्हापूर) यांनी दिली. मंगळवारी जिल्हा न्यायाधीश क्रमांक सहा एल.डी.बिले यांच्या न्यायालयात यावर सुनावणी झाली.

सरकारतर्फे सरकारी वकील अ‍ॅड. ए.एम.पिरजादे यांनी काम पाहिले. याची पुढील सुनावणी १९ जून २०१७ ला होणार आहे. शिवाजी पेठ येथील सि.स.नं. १५४४ / ब वडिलार्जीत मालमत्तेपैकी १६.७ चौरस मीटर जागा कोल्हापूर महापालिकेने विना मोबदला शौचालस पॅसेज म्हणून ताब्यात घेतली आहे. ही जागा परत नावावर करुन मिळण्याबाबत संतोष पाटील यांच्या वडिलांनी १५ जानेवारी २०१४ ला महापालिकेचे आयुक्त, इस्टेट विभाग यांचे नांवे अर्ज केला होता.

या अर्जानूसार महापालिकेच्या संबधित विभागाकडून अभिप्राय झाला होता व महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ेये हा ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर संतोष पाटील यांनी याबाबत इस्टेट विभागाकडे माझ्या कामाबाबत चौकशी केली असता यावर महापौर यांची सही झाली नसल्याचे इस्टेट विभागाने सांगितले. त्यानूसार तृप्ती माळवी यांची डिसेंबर अखेरीस त्यांच्या महापालिकेच्या केबिनमध्ये भेट घेतली व आॅर्डर कधी मिळणार अशी विचारणा केली. त्यावर माळवी यांनी खासगी स्विय सहाय्यक अश्विन गडकरी यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर गडकरी यांची भेट घेतली असता, महापौर मॅडमना, तुमच्या जागेच्या कामावर सही करण्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील असे मला गडकरी यांनी सांगितले. त्यानंतर १५ दिवसांनी पैसे नसल्याने मी माळवी मॅडम यांना त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन विनंती केली असता त्यांनी गडकरी यांना भेटा व ते सांगतील त्याप्रमाणे करा, असे मला त्यांनी सांगितले. त्यानंतर झालेल्या तडजोडीत १५ हजार रुपये द्यावयाचे ठरले.

दरम्यान, ३० जानेवारी २०१५ ला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानूसार मी दूपारी महापालिकेत गेलो. पण, कोण भेटले नाही. याचदिवशी सायंकाळी मी लाचेचे १५ हजार आणि गडकरीला एक हजार असे एकूण १६ हजार रुपये महापालिकेत दिले. हे लाचेचे पैसे गडकरीने पॅन्टच्या वेगवेगळ्या खिशात ठेवले. त्यानंतर गडकरीने मला मॅडमना जाऊन भेटा असे सांगितले. त्यावर आपण दोघे जाऊ,असे मी त्याला सांगितल्यावर मी व गडकरी महापौर चेंबरमध्ये गेलो. गडकरी बाहेर थांबला. माझ्या कामासाठी गडकरीला १६ हजार रुपये दिल्याचे सांगून ‘माझे काम केव्हा करणार असे महापौर माळवी यांना विचारले’ त्यावर ‘ मी तुमचे काम करुन देते ’असे त्या मला म्हणाल्या, असे संतोष पाटील यांनी यावेळी सांगितले.

माळवी गैरहजर...

या लाच प्रकरणात संशयित माजी महापौर तृप्ती माळवी व गडकरी यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी या दोघांनाही अटक झाली होती. मंगळवारी बिले यांच्या न्यायालयात सुनावणीवेळी तृप्ती माळवी या हजर नव्हत्या. माळवी यांनी त्यांच्या वकीलामार्फत मी अपरिहार्य कारणास्तव सुनावणीला हजर राहू शकत नाही,असे न्यायालयाला कळविले होते, अशी माहिती सरकारी वकील अ‍ॅड.ए. एम.पिरजादे यांनी पत्रकारांना दिली. 

Web Title: 16 thousand rupees bribe to the Mayor's assistant assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.