नऊ नगरपालिकांमध्ये होणार १६ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स, सहा तालुक्यांमध्ये प्रयाेगशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:48 PM2022-04-21T12:48:34+5:302022-04-21T12:58:45+5:30

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून हा निधी मंजूर करण्यात आला असून तातडीने ही सेंटर्स सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

16 Urban Health Wellness Centers will be set up at nine municipalities in Kolhapur district | नऊ नगरपालिकांमध्ये होणार १६ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स, सहा तालुक्यांमध्ये प्रयाेगशाळा

नऊ नगरपालिकांमध्ये होणार १६ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स, सहा तालुक्यांमध्ये प्रयाेगशाळा

googlenewsNext

समीर देशपांडे

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या ठिकाणी १६ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्सची स्थापना करण्यात येणार आहे तसेच सहा तालुक्यांच्या ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय आणि आधुनिक प्रयोगशाळाही स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी २० कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून हा निधी मंजूर करण्यात आला असून तातडीने ही सेंटर्स सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरपालिकांच्या क्षेत्रातील झोपडपट्टी आणि स्थलांतरित नागरिक यांच्यासाठी प्रामुख्याने ही सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी एक एमबीबीएस डॉक्टर, एक नर्स, एक बहुउद्देशीय आरोग्यसेवक, एक सफाई कामगार आणि एक रक्षक अशा पाच जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ९ नगरपालिकांमध्ये अशी १६ सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत या सेंटरवर रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर घरभेटींच्या माध्यमातून आरोग्यविषयक कामे करावी लागणार आहेत.

यासाठी नगरपालिका क्षेत्रातील ज्या आरोग्य संस्थांच्या इमारती विनावापर असतील त्या वापरात घेण्यासाठी प्राधान्य देणे अपेक्षित असून अगदीच त्या परिसरात जागा मिळाली नाही तर भाड्याने जागा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

याच पद्धतीने सहा तालुक्यांमध्ये ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी दोन मजली इमारत बांधण्यात येणार असून वरच्या मजल्यावर कार्यालय असेल तर खाली प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या रक्त, लघवीसह महत्त्वाच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. यासाठी साथरोग नियंत्रक, रक्त परीक्षक, डाटा मॅनेजर आणि दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ नेमण्यात येणार आहेत.

या नगरपालिकांमध्ये होणार सेंटर्स सुरू

नगरपालिका    सेंटर्स
मुरगुड              १
कागल             २
जयसिंगपूर         २
कुरुंदवाड          २
गडहिंग्लज         २
मलकापूर          १
इचलकरंजी        ३
पन्हाळा            १
पेठवडगाव         २

सध्याच्या रुग्णालयांवरील ताण होणार कमी

या नगरपालिकांच्या ठिकाणच्या सध्याच्या शासकीय रुग्णालयांवर मोठा ताण आहे. स्थलांतरित नागरिकांचाही मोठा ताण असून यामुळेच झोपडपट्टी, स्थलांतरित मजूर व कामगार वर्ग यांची गरज ओळखून ही नवी सेंटर्स सुरू करण्यात येणार असून महिनाभरात ही सुरू करण्यात येणार आहेत.

Web Title: 16 Urban Health Wellness Centers will be set up at nine municipalities in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.