दोन दिवसात १६०० कोटीची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:10+5:302021-03-17T04:24:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचा निषेध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन केले आहे. कोल्हापुरात दोन दिवसात १६०० कोटींची उलाढाल ठप्प झाली असून क्लिअरिंगबरोबर एटीएम बंद राहिल्याने ग्राहकांची हेळसांड झाली आहे.
संपाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी बँकिंग ठप्प होते. कोरोनाचा संसर्ग पाहता सर्व निर्बंध पाळून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ग्राहक व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून, खासगीकरण झाले तर सामान्य ग्राहकांची काय परवड होईल, हे पटवून सांगितले. राज्यात १० हजार बँका संपात सहभागी झाल्या असून कोल्हापुरातील १५० शाखा दोन दिवस बंद राहिल्या. कोल्हापूर शहरातील सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने केली. हातात सरकारविरोधी फलक व डोक्यावर लाल छत्री घेऊन सरकारचा निषेध नोंदवला.
संपाचे नेतृत्व विकास देसाई, सुहास शिंदे, रमेश कांबळे, प्रमोद शिंदे, सूर्यकांत कर्णिक, तेजस्विनी पाटील, विवेक कुंभार, पांडुरंग वाईंगडे यांनी केले.
आगामी काळात तीव्र आंदोलन
केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही, तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
वसुलीच्या काळातच संप
मार्चअखेर आल्याने बँकिंग क्षेत्रात वसुलीला गती आली आहे. दोन दिवस संप राहिल्याने वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यातच संप जरी सरकारी बँकांचा असला तरी, सहकारी बँकांच्या व्यवहारावरही थोडा परिणाम झाला आहे.
जनआंदोलन उभारू - तुळजापूरकर
दोन दिवसांच्या संपाला सर्व मध्यवर्ती कामगार संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला. आगामी काळात केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात देशभर जनआंदोलन उभे करू, असा इशारा युनायडेट फोरम ऑफ बँक युनियन्सचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी दिला. \
फोटो ओळी :
केंद्र सरकारने सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात मंगळवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाच्या दारात कर्मचाऱ्यांनी लाल छत्र्या डोक्यावर घेऊन आंदोलन केले.
(फोटो-१६०३२०२१-कोल-बँक) (छाया- आदित्य वेल्हाळ)