शिरोळ तालुक्यात १६ हजार दुबार मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:39+5:302021-03-05T04:24:39+5:30
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात छायाचित्र मतदारयादीतून शोध घेतल्यानंतर १६ हजार १५२ दुबार मतदार दिसून आले आहेत. त्यानुसार त्यांना नोटिसा ...
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात छायाचित्र मतदारयादीतून शोध घेतल्यानंतर १६ हजार १५२ दुबार मतदार दिसून आले आहेत. त्यानुसार त्यांना नोटिसा लागू करण्याची मोहीम निवडणूक विभागाने सुरु केली आहे. यामुळे मतदारांनी कोणत्याही एका ठिकाणी आपले नाव कमी करायचे आहे. मात्र, त्यानंतरही असा प्रकार आढळून आल्यास अशांवर कारवाई केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शिरोळ विधानसभा मतदारसंघातील छायाचित्र मतदार यादीमध्ये दुबार मतदारांची माहिती पुढे आली आहे. नोटीस मिळाल्यानंतर लेखी म्हणणे अथवा रहिवासी असलेला पुरावा मतदारांनी मुदतीत सादर करावा. ही माहिती मुदतीत सादर न केल्यास कोणतेही एक नाव कायम ठेवून दुसरे नाव वगळण्यात येणार आहे. दुबार मतदाराचा हा प्रकार जयसिंगपूर, कुरुंदवाडसह काही गावातच दिसून येत आहे. शिरोळ निवडणूक कार्यालयातून दुबार नावे कमी करण्याबाबत अशा मतदारांना नोटिसीव्दारे सूचना देण्यात येत आहे. ज्या मतदारांनी मतदार यादीमध्ये दुबार नावे नोंदविली आहेत, असे मतदार मतदान केंद्रावर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या राहत असलेल्या ठिकाणचे नाव कायम ठेवून अन्य ठिकाणचे नाव कमी करुन घ्यावे, असे आवाहन शिरोळ निवडणूक विभागाने केले आहे.