अडीच महिन्यांत १६२ डेंग्यूचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:27 AM2021-08-14T04:27:55+5:302021-08-14T04:27:55+5:30
महानगरपालिका हद्दीत पावसाळा सुरू झाल्यापासून आणि विशेषकरून महापूर ओसरल्यानंतर डेंग्यूची साथ शहरात पसरली आहे. शहरातील जनरल फिजिशियन्सकडे रोज नवीन ...
महानगरपालिका हद्दीत पावसाळा सुरू झाल्यापासून आणि विशेषकरून महापूर ओसरल्यानंतर डेंग्यूची साथ शहरात पसरली आहे. शहरातील जनरल फिजिशियन्सकडे रोज नवीन डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. ताप, अंगदुखी, कणकण असलेल्या व्यक्ती जेव्हा जनरल फिजिशियन्सकडे जातात तेव्हा त्यांच्याकडून डेंग्यू व चिकुनगुण्याची तपासणी करायला सांगतात. खासगी लॅबमधून रुग्ण तपासणी करून घेतात. शासकीय लॅबकडे जाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे खासगी लॅबमधील नोंदणी होते की नाही यावरच प्रश्न तयार झाले आहे.
महापालिका प्रशासनाने डेंग्यू व चिकुनगुण्याची माहिती प्रशासनास देण्याची सूचना खासगी लॅब व रुग्णालये यांना केली आहे. जानेवारी ते १२ ऑगस्टपर्यंत एकूण २२२ डेंग्यूचे रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळते. त्यापैकी जून, जुलै व ऑगस्ट या अडीच महिन्यांत १६३ रुग्ण आढळले आहेत.
महापालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीपेक्षा अधिक संख्येने शहरात रुग्ण आहेत. महापूर ओसरल्यानंतर अनेक भागातील नीट स्वच्छता झालेली नाही, चिखल, दलदलीचे साम्राज्य अजून हटलेले नाही. अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागेत पाणी साचून राहिलेले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. एकाच वेळी अनेक सर्वेक्षण सुरू असल्यामुळे डेंग्यू सर्वेक्षणचे कामही संथगतीने सुरू आहे.