कोल्हापूर जिल्ह्यात होणार १६५ समूह शाळा, २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ४६८ शाळा

By पोपट केशव पवार | Published: October 11, 2023 01:19 PM2023-10-11T13:19:28+5:302023-10-11T13:20:40+5:30

प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू 

165 group schools will be established in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात होणार १६५ समूह शाळा, २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ४६८ शाळा

कोल्हापूर जिल्ह्यात होणार १६५ समूह शाळा, २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ४६८ शाळा

पोपट पवार

कोल्हापूर : राज्यात कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समूह शाळा (क्लस्टर स्कूल) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास १६५ समूह शाळा निर्माण होणार आहेत. या शाळांबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकर ते शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयास पाठविण्यात येणार आहेत.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळ शिक्षण मिळणे गरजेचे आहे. मात्र, राज्यातील अनेक शाळांची पटसंख्या कमी असल्याने अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास अडचणी येतात. ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने समूह शाळांची संकल्पना पुढे आणली. नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ व पुणे जिल्ह्यातील पाणशेत येथे समूह शाळांचा उपक्रम राबविला. याच धर्तीवर इतर जिल्ह्यांत कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या परिसरात समूह शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

याबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना २१ सप्टेंबरला पत्र पाठवून कमी पटसंख्येच्या शाळांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करण्यांदर्भातील प्रस्ताव १५ ऑक्टोबरपर्यंत पाठवण्यास सांगितले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कमी पटसंख्येच्या शाळांची यादी तयार करून शाळांचे एकत्रिकरण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ४६८ शाळा आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास १६५ समूह शाळा निर्माण होतील. याबाबतचे प्रस्ताव लवकरच शिक्षण आयुक्त कार्यालयास पाठविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा (१ ते २० विद्यार्थी )

आजरा-४४, भुदरगड-५९, चंदगड-६०, गडहिंग्लज-२०, गगणबावडा-२९, हातकणंगले-११, कागल-११, करवीर-१२, पन्हाळा-३२, राधानगरी-७६, शाहूवाडी-९९, शिरोळ-१५

जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थेचे आव्हान

ज्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असेल अशा शाळांचे एकत्रिकरण करून समूह शाळा बनतील. पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळेत ने-आण करण्यासाठी शाळाच वाहतुकीची व्यवस्था करणार आहे. शाहूवाडी, राधानगरीसारख्या अतिदुर्गम भागात रस्त्यांअभावी वाहतूक व्यवस्था करणे मोठे आव्हान असणार आहे.

समूह शाळेचे हे आहेत निकष

  • कमी पटसंख्येच्या शाळांपासून समूह शाळा मध्यवर्ती ठिकाणी असावी, ती बाराही महिने सुरू असलेल्या रस्त्याने जोडली असावी.
  • कमी पटसंख्येच्या शाळांपासून समूह शाळेपर्यंतचा बसप्रवास ४० मिनिटांपेक्षा कमी असावा


गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा व विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन, बौध्दिक क्षमता विकसित होण्यासाठी समूह शाळा गरजेच्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर या शाळांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल. - उदय सरनाईक, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषद कोल्हापूर.

Web Title: 165 group schools will be established in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.