कोरोना काळातही १६६ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:33+5:302021-05-05T04:37:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेले वर्षभर कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असतानाही महसूलने गेल्या आर्थिक वर्षात जमीन आणि गौण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेले वर्षभर कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असतानाही महसूलने गेल्या आर्थिक वर्षात जमीन आणि गौण खनिजातून १४७ कोटींची तर नगरपालिका, रोजगार हमी, शिक्षण कर, महापालिका यातून १९ कोटी अशा रितीने १६६ कोटींची वसुली केली आहे. ही वसुलीची रक्कम एकूण उद्दिष्टाच्या १४१ टक्के इतकी आहे.
गेले वर्षभर जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना काळातील व्यवस्थापनाचे काम करत आहे. प्रत्येकाकडे एक-एक जबाबदारी निश्चित करण्यात आली असतानाही महसूलच्या जबाबदाऱ्यांकडेही दुर्लक्ष झालेले नाही. कोरोनावरील उपाययोजनांसाठी राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात निधीची गरज असताना जिल्ह्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. राज्य शासनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर यातून उत्पन्न मिळत असते. प्रत्यक्ष करात जमीन, महसूल, गौणखनिज, मुद्रांक शुल्क याचा समावेश असतो. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क, जीएसटी, सेल्स टॅक्समधून शासनाच्या तिजोरीत गंगाजळी येत असते. यापैकी कोरोना काळातही महसूल विभागातील वसुली उद्दिष्टापेक्षा जास्त झाली आहे. याशिवाय विविध करातून १९ कोटी अशी १६६ कोटींची वसुली करण्यात आली.
--
२०२०-२१साठी जमीन महसूलचे उद्दिष्ट : ४७.४३ कोटी, वसुली : ५७.७६ (१२१.७८ टक्के
गौणखनिजाचे उद्दिष्ट : ५७ कोटी, वसुली : ८९.५१ कोटी (१५७.०४ कोटी)
एकूण उद्दिष्ट : १०४.४३ कोटी : झालेली वसुली : १४७.२७ कोटी (१४१.०२ टक्के)
--