Radhanagari Dam : सहा तासांत गेले तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून, तरीही भासणार नाही पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 01:04 PM2021-12-30T13:04:56+5:302021-12-30T13:08:20+5:30
राधानगरी धरणात काल, बुधवारी सकाळी ८ वाजता ६.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. दुपारी हाच साठा ६.६८ पर्यंत खाली आला.
कोल्हापूर : सर्व्हिस गेटची अडचण आल्याने राधानगरीधरणातून सहा तासांत तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून गेले आहे. १ एफसीएफटी म्हणजे १० लाख घनफूट धरले तर १६ कोटी ६० लाख घनफूट पाणी भोगावती, पंचगंगा, कृष्णा असे करत थेट अलमट्टी धरणात जाऊन पोहचणार आहे. ०.२४ टीएमसी पाणी कमी झाले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अतिरिक्तच असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा फारसा प्रश्न येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.
राधानगरी धरणातील सर्व्हिस गेटची दुरुस्ती सुरू असताना सकाळी अचानक अपघात होऊन पाण्याचा मोठा प्रवाह सांडव्यावरून थेट भोगावती नदीपात्रात कोसळू लागला. ही घटना सकाळी सव्वा नऊवाजता घडली आणि दुपारी सव्वातीन वाजता पाणी बाहेर पडणे बंद झाले. जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर यावर यश मिळवले, पण तोपर्यंत १६६ एमसीएफटी एवढे पाणी धरणातून निघून गेले होते.
राधानगरी धरणात बुधवारी सकाळी ८ वाजता ६.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. दुपारी हाच साठा ६.६८ पर्यंत खाली आला. त्यातील ०.२४ टीमएमसी अर्थात १६६ एमसीएफटी पाणी वाहून गेल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या वर्षी याच महिन्यात धरणात ६.४८ टीएमसी पाणी शिल्लक होते, आता ते ६.६८ राहिल्याने पाणीसाठ्यावर फार मोठा परिणाम होणार नाही. मुळातच यावर्षी अवकाळी पाऊस डिसेंबरपर्यंत पडत राहिल्याने धरणात अतिरिक्तच पाणीसाठा होता. गतवर्षीपेक्षा अजूनही ०.२० टीएमसी पाणी धरणात जास्त आहे, त्यामुळे पाणी वाहून गेल्याने फार मोठे नुकसान झाले आहे, भविष्यात मोठी पाणीटंचाई जाणवणार आहे, यापैकी काहीही घडणार नाही.
- एमसीएफटी म्हणजे १ दशलक्ष अर्थात १० लाख घनफूट पाणी
- घनफूट प्रतिसेंकद म्हणजे एक क्यूबिक
- घनफूट म्हणजे २८ हजार ३१७ लिटर पाणी