कोल्हापूर जिल्ह्यातील १६६८ वीज बिल थकबाकीदारांची ‘बत्ती गुल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:26 PM2019-02-23T18:26:16+5:302019-02-23T18:28:22+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १६६८ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून धडक कारवाई करून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ८२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १६६८ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून धडक कारवाई करून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ८२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात महावितरणने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी व हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. वीजग्राहकांकडे महावितरणच्या मासिक वीजबिलांचा एक रुपयाही थकीत राहणार नाही. या ध्येयाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत संबंधित थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडितच करण्याचे निर्देश सर्व अधिकारी व जनमित्रांना देण्यात आलेले आहेत. गेल्या काही महिन्यांतील वाढत्या थकबाकीची गंभीर दखल घेऊन थकबाकी वसुलीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयनिहाय थकबाकी व होणारी वसुली यांचे दैनंदिन पर्यवेक्षण वरिष्ठ पातळीवरून सुरू करण्यात आले आहे.
घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये थकबाकीदार असणाऱ्या जिल्ह्यातील १६६८ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये ८२८ जणांचा कायमस्वरूपी, तर ८४० जणांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदाराने अनधिकृतपणे वीजवापर केल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज बिल भरणा केंद्रे आज, उद्या सुरू राहणार
दरम्यान, थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ह्यमहावितरणह्णची कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्रे आज, शनिवारी व उद्या, रविवारी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. याशिवाय घरबसल्या आॅनलाईन पेमेंटसाठी महावितरणने वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध केली आहे.