नागरी बँकांच्या ठेवीत १७ अब्जांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:53 AM2019-06-30T00:53:28+5:302019-06-30T00:53:58+5:30
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ नागरी सहकारी बँकांपैकी ४६ नागरी बँका नफ्यात असून, त्यांच्या एकूण ठेवीत तब्बल १७ अब्ज २८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण ठेवी ११,२५९ कोटी झाल्या आहेत.
- रमेश पाटील ।
कोल्हापूर : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ नागरी सहकारी बँकांपैकी ४६ नागरी बँका नफ्यात असून, त्यांच्या एकूण ठेवीत तब्बल १७ अब्ज २८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण ठेवी ११,२५९ कोटी झाल्या आहेत. वाढलेल्या ठेवी या नागरी बँकांवर ग्राहकांनी टाकलेला दृढ ‘विश्वासाचे’ प्रतीक मानले जात आहे.
जिल्ह्यातील नागरी बँकांना यावर्षी ८१ कोटी रुपयांचा नफा झाला. गतसाली तो ७० कोटींच्या घरात होता. नफ्यात १० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गतसालापेक्षा यंदा ६९९ कोटी रुपयांची जादा कर्जे दिल्याने तसेच त्या कर्जाची योग्य पद्धतीने वसुली केल्याने बँकांना हा नफा झालेला आहे. या बँकांनी कर्ज देताना पुरेसे तारण घेऊन, तसेच कागदपत्रांची खातरजमा करूनच कर्जे दिल्याने दिलेल्या कर्जाची वसुली वेळेत आणि चांगली झाली आहे. नफ्याचे प्रमाण पाहता लहान बँकांना पन्नास लाखांच्या वरती, तर मध्यम व मोठ्या बँकांना एक ते पाच कोटींच्या वर नफा झालेला आहे. अडचणीत असलेल्या युथ बँकेनेही आता थकीत कर्जाच्या वसुलीला जोर लावला आहे. नागरी बँकांपैकी निम्म्याहून अधिक बँकांचा एनपीए शुन्य टक्के आहे. तर उर्वरित बँकांचा एक ते पाच टक्क्यांच्या घरात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या एनपीएमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच नागरी बँकांचा एनपीए कमी होऊन शून्य टक्क्यांवर आला आहे.
१८ हजार कोटींचा व्यवसाय
नागरी बँकांनी यंदा १७ हजार ९५८ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे, तर चार हजार १३४ कोटी रुपयांची विविध खात्यांमध्ये, तसेच सरकारी रोख्यांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार गुंतवणूक केली आहे. नागरी बँकांच्या जिल्ह्यात एकूण शाखा ४९० च्या घरात पोहोचल्या आहेत. तसेच वर्षभरात विविध बँकांनी नवीन ८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरी बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणारी चांगली सेवा आणि बँकांबाबतची वाढत चाललेली विश्वासार्हता या जोरावर नागरी बँकांच्या ठेवीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. - निपुण कोरे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा
नागरी बँक असोसिएशन.
नागरी बँका राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देत आल्या आहेत. त्यामुळे नागरी बँकांच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे.
- अनिल नागराळे,
मुख्य कार्यकारी अधिकारी,कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन.