शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १७ हजार विद्यार्थी परीक्षेला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:08+5:302021-05-28T04:19:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने दोनवेळा संधी देऊनही १७ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पर्याय नोंदविलेला नाही. त्यामुळे हे ...

17,000 students from Shivaji University will pass the exam | शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १७ हजार विद्यार्थी परीक्षेला मुकणार

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १७ हजार विद्यार्थी परीक्षेला मुकणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने दोनवेळा संधी देऊनही १७ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पर्याय नोंदविलेला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि. २२ मार्चपासून सुरू झाल्या. त्यासाठी एकूण २ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाने ऑफलाईनबरोबरच ऑनलाईन परीक्षा देण्याचा पर्याय ठेवला होता. त्यावर १ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देण्याचा पर्याय निवडला. यानुसार परीक्षा सुरू झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व परीक्षा या ऑनलाईन स्वरूपात घेण्याची सूचना दि. ६ मे रोजी पत्राद्वारे विद्यापीठांना केली. या सूचनेनुसार विद्यापीठाने ज्या ४७ हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्याचा पर्याय निवडला होता. त्यांनी ऑनलाईन पर्याय निवडून त्याची नोंद विद्यापीठाच्या संकेतस्थळावर करण्यासाठी दोनवेळा संधी दिली. त्यामध्ये ऑफलाईनमधील ३० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पर्याय निवडला. पर्याय नोंदविण्याची मुदत संपली, तरीही अद्याप १७ हजार विद्यार्थ्यांनी याबाबत काहीच प्रक्रिया केलेली नाही. त्यामध्ये विद्यापीठातील विविध अधिविभाग, संलग्नित महाविद्यालये आणि दूरशिक्षण केंद्राच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विविध सत्रांतील (सेमिस्टर) विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि यूजीसीच्या सूचनेनुसार सध्या ऑफलाईन पर्याय दिलेल्या १७ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य नाही. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत अधिकारमंडळाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- गजानन पळसे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

चौकट

९८५०० विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण

विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र तीन, चार, पाच, सहामधील एकूण ९८५०० विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण झाली आहे. प्रथम सत्राच्या परीक्षा दि. २५ मेपासून सुरू झाल्या आहेत. त्यातील १५ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दिली आहे. परीक्षा मंडळाने मंगळवार (दि. २५) पर्यंत एकूण २४६ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

परीक्षेसाठी नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी : २ लाख १६ हजार

क्लस्टर पद्धतीने परीक्षा देणारे विद्यार्थी : ६० हजार

महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे परीक्षा देणारे विद्यार्थी : ९० हजार

ऑफलाईन टू ऑनलाईन पर्याय नोंदविणारे विद्यार्थी : ३० हजार

Web Title: 17,000 students from Shivaji University will pass the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.