कोल्हापूर ते कळे महामार्गासाठी १७१ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:32+5:302021-04-24T04:24:32+5:30
कोल्हापूर : तळकोकणाला जाणारा कोल्हापूर ते कळे दरम्यान १६.४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात ...
कोल्हापूर : तळकोकणाला जाणारा कोल्हापूर ते कळे दरम्यान १६.४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार संजय मंडलिक यांना पाठवले आहे. मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर ते तळेरे (सिंधुदुर्ग जिल्हा) दरम्यान रस्त्याची सुधारणा करावी यासाठी गडकरी यांची भेट घेतली होती.
कोल्हापूर ते तळेरे हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र व तळकोकण यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून या रस्त्यावर पर्यटन, उद्योग आदी कारणांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देऊन या रस्त्याच्या मजबुतीकरण व दुपदरीकरणासाठीचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. येथे रस्त्यावरील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी लहान पूल बांधण्यात येणार असून बालिंगा येथे भोगावती नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला समांतर नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी जमिनीचे संपादन करण्यात येणार असून या कामाची निविदा प्रक्रिया राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे, अशी माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
---