पतीचा एन्काउंटर करण्याची भीती घालून १८ लाख लांबवले, कोल्हापुरातील महिलेची फसवणूक
By उद्धव गोडसे | Published: September 9, 2024 05:04 PM2024-09-09T17:04:00+5:302024-09-09T17:04:41+5:30
मोबाइल नंबरवरून संशयिताचा शोध सुरू
कोल्हापूर : तुमच्या पतीचा एन्काउंटर करण्याची सुपारी मला मिळाली आहे. पैसे दिले नाहीत, तर त्याचा एन्काउंटर करणार, अशी भीती घालून अज्ञाताने महिलेच्या बँक खात्यावरील १८ लाख रुपये स्वत:च्या बँक खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले. हा प्रकार ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान घडला. याबाबत स्मिता संतोष सरुडकर (वय ४६, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) यांनी रविवारी (दि. ८) राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभानगर येथे राहणा-या स्मिता सरूडकर यांच्या मोबाइलवर ३१ ऑगस्टला व्हॉट्सॲप कॉल आला. अनोळखी व्यक्तीने मुंबई येथील क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगत सरूडकर आणि त्यांच्या पतीच्या बँक खात्यांची माहिती घेतली. संतोष सरूडकर यांच्या बँक खात्यावर २० लाख रुपये शिल्लक असल्याचे लक्षात येताच त्याने पुन्हा फोन करून फिर्यादी स्मिता यांना तुमच्या पतीचा एन्काउंटर करण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले.
दोन दिवस त्याने वारंवार फोन करून पतीचा एन्काउंटर करणार असल्याची भीती घातली. त्यानंतर एन्काउंटर टाळायचा असल्यास १८ लाख रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यास सांगितले. भीतीपोटी स्मिता सरूडकर यांनी १८ लाख रुपये अनोळखी व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला सर्व प्रकार घरात सांगितला.
मोबाइल नंबरवरून संशयिताचा शोध सुरू
संशयिताने व्हॉट्सॲप कॉलसाठी वापरलेला मोबाइल नंबर आणि पैसे वर्ग झालेल्या बँक खात्याचा तपशील मिळवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी सायबर शाखेची मदत घेतली जात आहे. संबंधित नंबर राज्याबाहेरील असावा, अशी माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली.