कोल्हापुरातील १८ लाख लुटीचा चार तासांत छडा, फिर्यादीच निघाला चोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 01:48 PM2024-08-22T13:48:04+5:302024-08-22T13:48:50+5:30

साथीदाराच्या मदतीने लांबवली रोकड, कार चालक फिर्यादी महेश पाटील ताब्यात

18 lakhs stolen in Kolhapur within four hours, the prosecutor turned out to be the thief | कोल्हापुरातील १८ लाख लुटीचा चार तासांत छडा, फिर्यादीच निघाला चोर

कोल्हापुरातील १८ लाख लुटीचा चार तासांत छडा, फिर्यादीच निघाला चोर

कोल्हापूर : कार्यालयातील सहकाऱ्याच्या शालेय मुलीला घेण्यासाठी आलेला कारचालक कारमधून उतरताच अज्ञाताने कारमधील १८ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. हा प्रकार भोसलेवाडी चौकात बुधवारी (दि. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. भरवस्तीत वर्दळीच्या चौकात झालेल्या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. 

मात्र, कारचालक महेश एकनाथ पाटील (वय २८, रा. पासार्डे, ता. करवीर) यानेच साथीदाराच्या मदतीने १८ लाखांची लूट केल्याचा प्रकार शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत उघडकीस आणला आणि या गुन्ह्यातील फिर्यादीच आरोपी बनला. पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रोकड पळविणाऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भोसलेवाडी येथील बांधकाम ठेकेदार राहुल भोसले यांच्या इनामदार कन्स्ट्रक्शन फर्मचे कार्यालय दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवरमध्ये आहे. त्यांच्या कार्यालयात प्रसाद गावडे हा कर्मचारी आहे, तर महेश पाटील हा कारचालक आहे. भोसले यांच्या सांगण्यावरून कर्मचारी गावडे आणि कारचालक पाटील यांनी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीतील एका बँकेतून १८ लाखांची रक्कम काढली. रोकड ठेवलेली बॅग कारमध्ये चालकाच्या डाव्या बाजूला ठेवली. त्यानंतर चालक पाटील आणि कर्मचारी गावडे दोघे भोसलेवाडीत मालक राहुल भोसले यांच्या घरी गेले. कर्मचारी गावडे मालकांच्या घरी थांबले, तर चालक पाटील हा गावडे यांच्या शाळेतून येणाऱ्या मुलीला घेण्यासाठी भोसलेवाडी चौकातील माझी शाळेसमोर कार लावून थांबला.

काही वेळात शाळेची बस येताच मुलीला घेण्यासाठी चालक कारमधून उतरला. त्याचवेळी एका व्यक्तीने कारचा दरवाजा उघडून रोकड असलेली बॅग घेऊन कसबा बावड्याच्या दिशेने पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच स्कूल बसच्या चालकाने आरडाओरडा केला. त्यावेळी पाटील याने कारकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरटा पैशाची बॅग घेऊन पळाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर हे भोसलेवाडी चौकात पोहोचले. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. चौकशीसाठी पोलिसांनी कार ताब्यात घेतली.

चौकशीत चालक गडबडला

कारचालक महेश पाटील याने संशयित चोरट्याचे वर्णन पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. मात्र, आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या वर्णनाचा संशयित आढळला नाही. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा चालकाची चौकशी केली. तेव्हा गडबडलेल्या चालकावर पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने अठरा लाखांची लूट केल्याची कबुली दिली. फिर्याद दिल्यानंतर तासाभरातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पाच दिवसात दुसऱ्या लुटीने खळबळ

साईक्स एक्स्टेंशन येथील एका कार्यालयातून १३ लाख २९ हजारांची रोकड लुटल्यानंतर पाच दिवसांत भोसलेवाडी चौकात १८ लाखांच्या लुटीची दुसरी घटना घडली. अवघ्या पाच दिवसांत घडलेल्या दोन घटनांमुळे शहरात खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास गतिमान केला. अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा उलगडा झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पोलिसांची दिशाभूल

चौकात कार पार्क केल्यानंतर केसांची शेंडी असलेला, राखाडी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केलेला, मजबूत बांध्याचा एक तरुण कारजवळ येऊन थांबला होता. चालकाने काच खाली घेऊन त्याला 'काय पाहिजे' असे विचारले. त्यावर त्या तरुणाने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर तो चोरी करून कसबा बावड्याच्या दिशेने पळाला अशी दिशाभूल कार चालकाने केली होती. मात्र, त्याचा बनाव चौकशीत उघडकीस आला.

Web Title: 18 lakhs stolen in Kolhapur within four hours, the prosecutor turned out to be the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.