जिल्ह्यात १८ हजार महिला ‘तंबाखू’च्या आहारी

By admin | Published: April 29, 2015 12:01 AM2015-04-29T00:01:29+5:302015-04-29T00:26:10+5:30

आरोग्य अभियानातील माहिती : आरोग्य विभाग राबवणार तंबाखू सेवनविरोधात मोहीम

18 thousand women in the district 'Tobacco' diet | जिल्ह्यात १८ हजार महिला ‘तंबाखू’च्या आहारी

जिल्ह्यात १८ हजार महिला ‘तंबाखू’च्या आहारी

Next

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर --मोफत महिला आरोग्य तपासणी अभियानात जिल्ह्णातील तब्बल १७ हजार ८३९ महिला तंबाखू, मिशेरीच्या आहारी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यात येथील जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ३० वर्षांवरील महिलांच्या मोफत आरोग्य तपासणीत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग तंबाखू सेवनविरोधी व्यापक मोहीम राबविण्यासंबंधी गांभीर्याने विचार करत आहे.
अभियान काळात जिल्ह्यातील ३० वर्षांवरील ३२ हजार ४४५ महिलांनी स्वत:हून प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली. त्यामधील १७ हजार ८३९ महिला तंबाखू, मिशेरी व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती तोंडाची तपासणी केल्यानंतर उघड झाली. प्रत्यक्षात तपासणी करून घेतलेल्या महिलांतून तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेलेल्यांची ही आकडेवारी आहे. तपासणीसाठी न आलेल्या मात्र तंबाखूच्या आहारी गेलेल्या महिलांची संख्या याशिवाय आणखी मोठी असू शकते, अशी शक्यता आरोग्य सूत्रांनी वर्तविली आहे. त्यामुळे सविस्तर सर्व्हे करण्याचा विचार आरोग्य विभाग करत आहे.
दरम्यान, तंबाखूच्या व्यसनामुळे राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तोंडाचा कर्करोग झाला. त्यातच त्यांचा अंत झाला. त्यानंतर शासकीय पातळीवरही तंबाखू बंदीची चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र, अजूनही तंबाखू, मावा, गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही.
महाविद्यालयीन व शालेय मुलेही पहिल्यांदा मजा म्हणून गुटखा टेस्ट बघतात. कालांतराने गुटखा, मावा खाणे परवडत नसल्यामुळे तंबाखू चोळली जाते. युवक आणि पुरुष तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात अडकत असतात. मात्र, महिलाही मोठ्या प्रमाणात याच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. खासकरून ग्रामीण भागात याचे जास्त प्रमाण आहे.
ग्रामीण भागात पूर्वी पहाटे तंबाखू भाजून तयार केलेल्या मिशेरीपासून दात घासण्याची प्रथा होती. अजूनही ग्रामीण भागात हे प्रमाण आहे. आहारी गेलेल्यांना मिशेरीपासून दात घासल्याशिवाय चैन पडत नाही. काहीजणांना तंबाखू चघळल्याशिवाय शौचविधी होत नाही, असे सांगतात. त्यास कोणताही वैद्यकीय आधार नाही. मात्र, व्यसनी लोकांकडून याचे समर्थन केले जाते. तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होतो. पचनक्रिया व्यवस्थेवर विपरित परिणाम होतो. महिलांमध्ये मानसिक पाळीच्यावेळी त्रास होतो. गर्भाशयाचे आजार होतात. इतके गंभीर तंबाखूचे व्यसन आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी आरोग्य विभाग व्यापक जागृती करत असते. मात्र, या व्यसनापासून लांब राहणाऱ्यांची संख्या अपेक्षित घटत नसल्याचे चित्र आहे.


राधानगरी तालुक्यात सर्वाधिक..
आरोग्य तपासणी अभियानात तपासणी करून घेतलेल्या महिलांमध्ये तंबाखू, मिशेरी, तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी गेलेल्यांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - ४५, भुदरगड - २५६२, चंदगड - ४३६, गडहिंग्लज - ४५, गगनबावडा - ४२०, हातकणगंले - १४०, करवीर - २४४, कागल - ४९१९, पन्हाळा - १५९९, राधानगरी - ६६४७, शाहूवाडी - ७२९, शिरोळ - ५३. या आकडेवारीवरून सर्वाधिक राधानगरी तर सर्वांत कमी शिरोळ तालुक्यात महिला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होते.


आरोग्य अभियान काळात तपासणी करून घेतलेल्यांपैकी १७ हजार ८३९ महिला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे तंबाखूविरोधी जागृती व्यापकपणे केली जाणार आहे. तंबाखूच्या आहारी गेलेल्या महिलांना परावृत्त करण्यासाठी समुपदेशनसारखा उपक्रम राबविण्याचा विचार आहे.
- डॉ. आर. एस. आडकेकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: 18 thousand women in the district 'Tobacco' diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.