भर पावसात रंकाळा प्रदक्षिणा; डॉ. दीक्षित यांच्या उपक्रमात शेकडो कोल्हापूरांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 04:40 PM2019-09-15T16:40:12+5:302019-09-15T16:45:04+5:30
डॉ. दीक्षित यांच्या पाच किलोमीटर चाला उपक्रमात १८०० जण सहभागी
कोल्हापूर: कोल्हापुरी माणसांपुढे पुन्हा एकदा आज पाऊस हरला. निमित्त होते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेल्या थ्रीडी वॉकथॉन, पाच किलोमीटर चाला उपक्रमाचे. पाच देशात, २० राज्यात, १९२ शहरात आज पार पडलेला हा उपक्रम कोल्हापूरमध्ये रंकाळा प्रदक्षिणा नावाने राबवण्यात आला. सकाळी साडे सहा वाजता एकत्र जमून ठीक साडेसात वाजता हा उपक्रम सुरू झाला. दिवंगत डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या जयंती निमित्त आयोजित या उपक्रमाची सुरुवात जिचकार यांना श्रद्धांजली वाहून झाली.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई तसेच आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आजच्या प्रदक्षिणा उपक्रमासाठी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी महापुरादरम्यान केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक झाले. उपक्रमाचे आयोजक व प्रायोजक युनिक ऑटोमोबाईल्सच्या राहुल चोरडिया व विशाल चोरडिया यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी देसाई यानी स्वच्छता तर आयुक्तांनी प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला.
राष्ट्रगीतानंतर पाच किलोमीटर चालणे सुरू होताच पावसाला सुरुवात झाले. वरून कोसळणार्या मुसळधार पावसाला चारीमुंड्या चीत करत सहभागी १८०० आबालवृद्ध, महिला, पुरुष सदस्यांनी डोक्यावर युनिकने दिलेला नॅपकिन ठेवून झपाझप पावले टाकत शालिनी पॅलेस, रंकाळा चौपाटी, संध्यामठ, राज कपूर पुतळा, क्रशर चौक, पतौडी खण, पदपथ असे मार्गक्रमण केवळ 30 मिनिटात पूर्ण केले. विशेष म्हणजे सर्वांचे चालून झाले व पाऊस थांबला.
या उपक्रमात ८१ वर्षाचे बंडा माने हे आजोबा आणि ८ वर्षाचा आशीष पोवार हेही सहभागी झाले होते. काल मध्यरात्री तीन वाजता म्हणजे सर्वात शेवटी संतोष जगताप यांनी नावनोंदणी केली व सकाळी सहभागी होवून त्यांनी सर्वात प्रथम प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा मान मिळवला. उपक्रमांनंतर सहभागी सदस्यांना जिल्हाधिकारी, आयुक्त तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी सभापती आशिष ढवळे, राजसिंह शेळके, रुपाराणी निकम, संजय मोहिते, अशपाक आजरेकर, निवृत्त पोलीस अधिकारी संघटनेचे मदन चव्हाण, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टचे अजय कोराणे उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी युनिक ऑटोमोबाईल्सचे ग्रुपहेड (एचआर) प्रणील खाडे, सुधर्म वाझे यांच्या नेतृत्वाखालील किशोर दाणेकर, वैभव नाईक, किरण श्रेष्ठी, बाबासो पाटील, दीपक देशपांडे, समित रेगे तसेच ब्रँडबॉक्सच्या हेमंत दळवी यांची टीम, बच्चनवेडे गृपचे राजू नान्द्रे, कुंदन ओसवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमात ऑनलाईन पद्धतीने नोंदणी झालेले व्हॉट्सअपचे प्रत्येकी २५७ सदस्य असलेले सहा ग्रुप्स आणि नोंद न केलेले जवळपास ३०० नागरिक असे १८०० कोल्हापूरकर सहभागी झाले होते. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दूरध्वनी वरुन या उपक्रमात सहभागी झालेल्यांचे कौतुक केले.