जलयुक्त शिवार योजनेसाठी १९ लाखांचा निधी
By admin | Published: September 17, 2016 11:43 PM2016-09-17T23:43:32+5:302016-09-17T23:58:39+5:30
दत्तात्रय शिंदे : ३१७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार; जिल्ह्यात ‘नो डॉल्बी’ची मोहीम यशस्वी
सांगली : जिल्ह्यात ‘नो डॉल्बी’ची मोहीम यशस्वी झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिस व प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत ‘डॉल्बी’ न लावता यावर होणारा सुमारे १९ लाखांचा निधी ‘जलयुक्त शिवार’ला दिला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ही तर सुरुवात आहे. यापुढे कोणताही उत्सव असो अथवा समारंभ ‘डॉल्बी’ लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तातडीने कारवाई झालेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, गणेशोत्सव सुरु करण्याचा लोकमान्य टिळक यांचा मूळ उद्देश हा समाजप्रबोधन करणे हा होता. त्याअनुषंगाने ध्वनी प्रदूषणाला बाजूला करीत समाजाच्या विकासाची सकारात्मक व विधायक कामे गणेश मंडळांनी हाती घेणे आवश्यक होते. शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविणाऱ्या जलयुक्त शिवारास मदत करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले होते. पोलिस ठाणे स्तरावर २२८ बैठका घेण्यात आल्या. पोलिस उपअधीक्षकांनी २५, विशेष पोलिस महानिरीक्षक व मी स्वत: एक अशा एकूण २२८ वेळा गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ३१७ मंडळांनी आतापर्यंत १८ लाख ५३ हजार ६०२ रुपयांची निधी दिला आहे. अजूनही काही मंडळांकडून मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच दुष्काळी भागात सिमेंट बंधारे बांधण्याचे काम सुरु होईल.
शिंदे म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी ४ हजार ६६० मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. सव्वालाख घरगुती मूर्र्तींची प्रतिष्ठापना झाली. उत्सव सुरु होण्यापूर्वीच १३६९ मंडळांनी ‘डॉल्बी’ लावणार नाही, असे लेखी अभिवचन दिले होते. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ‘डॉल्बी’शिवाय गणेशोत्सव साजरा झाला. गणेश मंडळांचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. उत्सवाच्या माध्यमातून सुरु झालेली विधायक कामाची ही चळवळ यापुढेच अशीच सुरु ठेवली जाईल. उत्सव काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेकॉर्डवरील पाच हजार गुन्हेगारांवर कारवाई केली. दोन हजारहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामुळे कुठेही तणाव निर्माण झाला नाही. मिरवणुकीत दारू पिऊन नृत्य करण्याचे प्रकारही कुठे घडले नाहीत. याच काळात बकरी ईद होती. तीही शांततेत पार पडली. चांगल्याप्रकारे उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना पोलिस ठाणे तसेच जिल्हा स्तरावर रोख बक्षीस देऊन सन्मान केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
‘डॉल्बी’मुक्तीतून ‘जलयुक्त शिवाराकडे’ अशी हाक दिली. गावोगावी बैठका घेतल्या. प्रसारमाध्यमांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे लोकांमध्ये तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास न जनजागृती निर्माण झाली. याचे फलित म्हणूनच ‘डॉल्बी’शिवाय उत्सव साजरा झाला आणि ‘जलयुक्त शिवाराचे’ विधायक काम मार्गी लागत आहे.
- दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख
शिंदे म्हणाले, गणेशोत्सवात जिल्ह्यात १९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ‘डॉल्बी’ लावण्याचा प्रयत्न केल्याचे सहा गुन्हे नोंद केले. मिरवणुकीत स्पिकर परवाना घेतला नाही, मिरवणूक संपवून येताना अपघातात गणेशभक्ताचा मृत्यू, प्रसाद घेण्यास दरवाजातून जाण्याच्या कारणावरुन मारामारी, मिरवणुकीत धक्का लागल्याचा जाब विचारल्यावरुन मारामारी व मिरवणुकीत डॉल्बी साहित्याचा वापर केल्याप्रकरणी असे प्रत्येक एक गुन्हे तसेच अचानक मिरवणूक मार्गात बदल केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत.