इथेनॉलमुळे १९ हजार कोटींची बचत
By Admin | Published: July 22, 2016 12:44 AM2016-07-22T00:44:49+5:302016-07-22T00:50:47+5:30
राजू शेट्टी यांची माहिती : ऊस शेतीला लाभ; तेल कंपन्यांद्वारे १२९ कोटी लिटरची मागणी
कोल्हापूर : ऊस पिकावर पाण्याच्या अतिवापराची टीका होत असताना इथेनॉलच्या तेलामध्ये मिश्रण करण्याच्या धोरणामुळे देशाची तब्बल १९ हजार कोटी रुपयांची बचत वर्ष २०१४-१५ मध्ये झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. इथेनॉलच्या वापरामुळे देशाला किती फायदा झाला, याबाबत संसदेत प्रश्न विचारला असता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली की, भारत सरकारकडून जुलै २०१३ पासून पूर्ण देशात पाच टक्के इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम हाती घेतला व हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोनुसार तेल कंपन्यांना १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण धोरणानुसार तेलात मिश्रण करण्याची परवानगी दिली. देशात ज्या भागात इथेनॉल पर्याप्त उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पाच टक्के इथेनॉल तेलात मिश्रण करण्याची तेल कंपन्यांना सक्ती केली आहे.
इथेनॉलची उपलब्धता वाढल्यावर टप्प्याटप्प्याने इथेनॉलच्या तेलात मिश्रणामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्धता वाढण्यासाठी इथेनॉलचा प्रतिलिटर दर ४८.५० ते ४९.५० रुपये करण्यात आल्याने त्याचा लाभ साखर उद्योगास होत असल्याचे दिसून आले.
यंदाच्या वर्षात तब्बल १२९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी तेल कंपन्यांद्वारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे सरकारकडे वारंवार तेलामध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. सप्टेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारद्वारे इथेनॉलचे तेलातील मिश्रण १० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला फायदा होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. वर्ष २०१४-१५ मध्ये इथेनॉलच्या तेलातील वापरामुळे देशाचे एकोणीस हजार कोटी रुपयांचे परकीय चलन बचत झाल्याने परकीय गंगाजळीमध्ये बचत झाली व एकार्थाने अर्थव्यवस्थेस फायदेशीर ठरले, असे शेट्टी यांनी सांगितले.