पोलिस पडताळणीअभावी पासपोर्टचे १९०० अर्ज प्रलंबित

By admin | Published: July 4, 2017 06:44 PM2017-07-04T18:44:33+5:302017-07-04T18:44:33+5:30

७२ तासांत कार्यवाही करण्याचे पोलीस ठाण्यांना आदेश : संजय मोहिते

1900 applications of passport pending due to police verification | पोलिस पडताळणीअभावी पासपोर्टचे १९०० अर्ज प्रलंबित

पोलिस पडताळणीअभावी पासपोर्टचे १९०० अर्ज प्रलंबित

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0४ : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. सध्या पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट कार्यालयात सुमारे १९०० अर्ज प्रलंबित आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ७२ तासात पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना मंगळवारी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांना दिली.

नागरिकांच्या सोयीसाठी चार महिन्यांपूर्वी कसबा बावडा येथील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात दरदिवशी २०० अर्ज दाखल होतात. या ठिकाणी पासपोर्ट अर्ज स्वीकारणे आणि देण्याची प्रक्रिया लवकर होत असल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, कऱ्हाड येथील लोकांचा वेळ आणि पैशांची बचत होत आहे.

दरम्यान, पोलिसांकडून अर्जांची पडताळणी वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी पासपोर्ट केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. पोलीस अधीक्षक मोहिते यांनी या तक्रारींची दखल घेत मंगळवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत अर्जांची पडताळणी करून ते पासपोर्ट केंद्राला पाठविण्याचे आदेश दिले.


अशी होते प्रक्रिया


पासपोर्ट काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तो अर्ज पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात सादर केला जातो. तेथून तो पोलीस पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. येथील गोपनीय विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या समोर ओळखपरेड करून सही घेऊन तो अर्ज टपालाने पुन्हा पासपोर्ट विभागाला पाठविला जातो. त्यानंतर तो येथील निरीक्षकांच्या सहीने कसबा बावडा येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राला पाठविला जातो. याठिकाणी उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर त्यांना जावक क्रमांक देऊन तो अर्ज पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. तेथून अर्जाला अंतिम मंजुरी मिळताच संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राकडे पाठविला जातो.



कार्यालयीन घोळ



संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो. काहीवेळा कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिभार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काहीवेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करीत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो.



२०० रुपये आकारणी


पासपोर्टची पोलीस पडताळणी मोफत केली जाते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारावे असा नियम नाही. तरीही पोलीस प्रत्येक अर्जामागे २०० रुपये घेतातच, अशी चर्चा नागरिकांत आहे

Web Title: 1900 applications of passport pending due to police verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.