पंढरपूर यात्रेसाठी १९० एस. टी. बसेसची सोय
By admin | Published: June 30, 2017 05:35 PM2017-06-30T17:35:25+5:302017-06-30T17:35:25+5:30
१० जुलैपर्यंत आगाऊ आरक्षणाची सोय
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 :श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे ३० जून ते १० जुलैदरम्यान आगाऊ आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. ४ जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्याकरिता १० जुलैपर्यंत १९० गाड्यांचे नियोजन केले आहे.
गतवर्षी कोल्हापूर विभागातून पंढरपूरच्या यात्रेसाठी ६६ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यातून महामंडळाला ५२ लाखांचे उत्पन्न मिळाले. यंदाही भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातील स्वतंत्र फलाटावरून पंढरपूरसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंकरिता कोल्हापूर ते पंढरपूर अशा स्वतंत्र गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
एकत्र येणाऱ्या भाविकांसाठी एकत्रितरीत्या गाडीचीही व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात आली आहे. या अंतर्गत आपल्या गावातून थेट पंढरपूर व परत आपल्या गावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी आरक्षणासाठी जवळच्या आगारप्रमुखांशी संपर्क साधावा. तसेच मध्यवर्ती बसस्थानकावर ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. भाविकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी केले आहे.