शिवाजी विद्यापीठात २४७ नवे अभ्यासक्रम सुरू होणार; सुधारित आराखडा मंजूर
By संदीप आडनाईक | Published: May 25, 2023 07:16 PM2023-05-25T19:16:02+5:302023-05-25T19:16:15+5:30
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सभागृहात ही बैठक झाली.
कोल्हापूर : जिल्हा स्तरावर लोककला महाविद्यालय, पदव्युत्तर डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, शारिरीक शिक्षण महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ हार्टिकल्चर अन्ड स्पायसेस, शुगर इन्स्टिट्यूट, तालुकास्तरावर क्रीडा, विधी, एकात्मिक शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, कला, वाणिज्य, विज्ञान रात्र महाविदयालये व कौशल्यावर आधारित २४७ नव्या अभ्यासक्रमांचा पाच वर्षांच्या बृहत आराखड्यात समावेश असून गुरुवारी झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत त्यास मंजुरी देण्यात आली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सभागृहात ही बैठक झाली.
विद्यापीठाचा २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांचा सुधारित बृहत आराखडा अधिसभेच्या विशेष बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. याच बैठकीत १० मार्चला झालेल्या अधिसभेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत कायम करण्यात आला. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील ५९ वा मराठी वार्षिक अहवालही मंजूर करण्यात आला. कुलगुरु डॉ. शिर्के म्हणाले, आटपाडी, राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्याच्या ठिकाणांचा नव्याने सॅटेलाईट सेंटर सुरू होतील. सिनेमा, नाटक, इतर कला, संगीत यांचा समावेश असलेले स्कूल ऑफ फाईन आर्टस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा मानस आहे. ललित कला महाविद्यालयाचाही बिंदू या आराखड्यात आहे. आराखडा पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
यावेळी अधिसभेसमोर प्रकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीतील वृतांत व विषयनिहाय झालेल्या चर्चेतील मुद्दे मांडले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील यांनी बृहत आराखडा सभागृहासमोर सादर केला. त्यात त्यांनी संबंधित आराखडा तयार करण्यासाठी राबविलेली प्रक्रिया, नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखा, महाविद्यालये आदींची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत अधिसभा सभागृहाने व्यवस्थापन परिषदेच्या सुधारित शिफारशीनुसार विद्यापरिषदेची सुधारित शिफारस विचारार्थ घेउन या पंचवार्षिक बृहत आराखड्यास मान्यता देण्यात आली.
विद्यापीठाचा २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील ५९ वा मराठी वार्षिक अहवालही मंजूर करण्यात आला. हा अहवाल डॉ. रघुनाथ ढमकले यांनी सादर केला. बृहत आराखड्याबाबत अधिसभा सदस्य विष्णू खाडे, संजय परमणे, श्रीनिवास गायकवाड, श्वेता परूळेकर, डी. एन. पाटील, डॉ. मनोज पाटील, ज्ञानदेव काळे, अभिषेक मिठारी, अमित कुलकर्णी, अमरसिंह राजपूत, डॉ. रघुनाथ ढमकले आदींनी आक्षेप, सूचना आणि तक्रारी मांडल्या. बैठकीस चंदगडचे आमदार राजेश पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजयसिंग जाधव, संलग्नता विभागाचे उपकुलसचिव डॉ. विलास सोयम आदी उपस्थित होते.
'सभात्याग' वरून सदस्य आक्रमक
मागील अधिसभा सभेत अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर काही सदस्यांनी काही काळासाठी या कृत्याचा निषेध करत सभात्याग केला होता. त्याचा उल्लेख व्हावा अशी सुधारणा ॲड. अभिषेक मिठारी आणि ॲड. अजित पाटील या सदस्यांनी दिली होती पण प्रशासनाने "काही सदस्य सभागृहाबाहेर जाऊन आले" असा बदल करुन "सभात्याग" शब्द वगळला. त्यामुळे राज्यपालांपर्यंत खरी माहिती न देता ती दडपण्याचा हा प्रयत्न असल्याने प्रारंभी अधिसभेत काही सदस्य आक्रमक झाले. त्यावर कुलगुरूंनी कायदेशीर तरतुदी पाहून निर्णय घेण्याचे जाहीर केले.