प्राधिकरणावर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत १७ ला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:54 AM2019-12-05T11:54:36+5:302019-12-05T11:55:47+5:30
प्राधिकरण करणार की थांबविणार ते एकदाच काय ते ठरवा; नाही तर कार्यालयालाच टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसने दिल्यानंतर आता येत्या १७ डिसेंबरला बैठक घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे जाहीर केले आहे.
कोल्हापूर : प्राधिकरण करणार की थांबविणार ते एकदाच काय ते ठरवा; नाही तर कार्यालयालाच टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसने दिल्यानंतर आता येत्या १७ डिसेंबरला बैठक घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे जाहीर केले आहे.
जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार वाईकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्राधिकरणाचा विषय प्रलंबित पडल्याने येत असलेल्या अडचणींचा पाढाच वाचला होता. यावर तातडीने निर्णय घ्यावा, असेही आवाहन केले होते. प्राधिकरणाची स्थापना झाली खरी; पण त्याची कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे कोल्हापूर शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतींचे कामकाजच ठप्प झाले आहे. बांधकाम परवान्यासह अन्य कामे प्रलंबित पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत.
या संदर्भात वारंवार अर्ज-विनंत्या करूनदेखील प्रशासन बधत नसल्याने सोमवारी (दि. २) जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. येत्या १५ दिवसांत याचा निर्णय न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशाराच दिला होता. यानंतर यंत्रणा गतिमान झाली असून, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे नियोजनच जाहीर केले आहे.