कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या वारणानगर शाखेत २.८६ कोटींचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:30 IST2024-09-24T13:29:39+5:302024-09-24T13:30:24+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता. पन्हाळा) शाखेत शाखाधिकारी तानाजी पोवार व लिपिक मुकेश पाटील यांनी ...

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या वारणानगर शाखेत २.८६ कोटींचा अपहार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता. पन्हाळा) शाखेत शाखाधिकारी तानाजी पोवार व लिपिक मुकेश पाटील यांनी संगनमताने ओव्हर ड्राफ्टची (ओडी) बोगस कर्ज प्रकरणे करत तब्बल दोन कोटी ८६ लाखांचा अपहार केला आहे. ‘ओडी’चे अधिकार शाखाधिकाऱ्यांना दिले आहेत, त्याचा गैरवापर करत दोघांनी हा डल्ला मारला असून, त्यांचे निलंबन करण्याऐवजी केवळ कामावर येण्यास मज्जाव केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखांत प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह इतर शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार होतो. बँकेच्या धोरणानुसार जमा होणाऱ्या रोख पगारावर बारा पट ओडी दिली जाते. वारणानगर शाखेत लिपिक मुकेश पाटील व शाखाधिकारी तानाजी पोवार यांनी सुमारे ३० हून अधिक खात्यातून परस्पर ‘ओडी’ उचलली आहे. त्यातील एका खातेदाराला कर्ज उचल केल्याचा मेसेज गेल्याने हे बिंग फुटले. संबंधितांनी शाखेत चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. बँक प्रशासनाने संबंधित प्रकरणाची चौकशी केली असता यामध्ये सुमारे दोनन कोटी ८६ लाखांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
ओडी देत असताना संबंधित कर्जदाराकडून स्टॅम्पवर हमीपत्र घ्यावे लागते. हमीपत्र दिल्यानंतर पैसे मिळतात. हमीपत्राशिवाय कर्ज प्रकरणे दिल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. ‘वारणानगर’ शाखेतील अपहारानंतर केडीसीसीच्या सर्वच शाखांतील ‘ओडी’ प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे.