Kolhapur: कळंबा जेलमध्ये मोबाइलप्रकरणी २ तुरुंग अधिकारी, ९ कर्मचारी बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:58 IST2024-04-30T11:58:03+5:302024-04-30T11:58:22+5:30
दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, अपर पोलिस महासंचालकांची कारवाई

Kolhapur: कळंबा जेलमध्ये मोबाइलप्रकरणी २ तुरुंग अधिकारी, ९ कर्मचारी बडतर्फ
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ढिसाळ कारभार आणि कैद्यांकडे सापडलेल्या ८० हून अधिक मोबाइलप्रकरणी कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दोन अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले, तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. आणखी दोन अधिकारी आणि काही कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. एकाचवेळी अनेकांवर कारवाई झाल्याने कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
कळंबा कारागृहात सातत्याने कैद्यांकडे सापडणारे मोबाइल, गांजाचा पुरवठा, कारागृहात कैद्यांमध्ये होणारी हाणामारी, अशा घटना उघडकीस आल्यामुळे कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन श्यामकांत शेडगे यांच्याकडे अधीक्षक पदाचा कार्यभार दिला होता. शेडगे यांनी पाठविलेल्या अहवालानुसार दोन वरिष्ठ अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशाने उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या कार्यालयाकडून दोषींवर कारवाई झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दोन अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली, तर दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आणखी दोन अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची वरिष्ठ कार्यालयाकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. एकाचवेळी ११ कर्मचारी बडतर्फ होण्याची कळंबा कारागृहातील ही पहिलीच वेळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाई झालेले कर्मचारी मॅटमध्ये दाद मागण्याची शक्यता आहे.
यांच्यावर झाली बडतर्फीची कारवाई
तुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के आणि सतीश कदम यांच्यासह सुरक्षा कर्मचारी अभिजित गोसावी, तानाजी गायकवाड, रवी पवार, वैभव पाटील, अनिकेत आल्हाट, वैशाली पाटील, सुहास वरखडे, संजय टिपुगडे आणि स्वप्नील हांडे यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली.
भुसारे, आडे यांची बदली
तत्कालीन प्रभारी अधीक्षक पांडुरंग भुसारे यांची पुणे येथे येरवडा कारागृहात बदली झाली, तर उपअधीक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात बदली झाली. या दोन्ही अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.