वाघजाई घाटात तिहेरी अपघात; २ ठार, ६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 11:06 AM2022-01-03T11:06:55+5:302022-01-03T12:15:06+5:30
रात्रीच्या सुमारास कागलकडे निघालेल्या मिनी टेम्पो, त्यामागे दुचाकी व त्यामागे बोलेरो गाडी कागलच्या दिशेने जात असताना समोरून शेंडूरकडून निढोरीच्या दिशेने येणारी उसाची ट्रॅक्टर-ट्राॅलीही समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनावर उलटली. यावेळी हा तिहेरी अपघातात झाला.
साके : कागल-निढोरी राज्यमार्गावर वाघजाई घाटात एम.एम.जी. गोठ्याजवळ गोरंबे (ता. कागल)जवळ धोकादायक वळणावर झालेल्या तिहेरी अपघातात एका महिलेसह दोन ठार, तर सहाजण जखमी झाले. रात्री आठ वाजता हा अपघात झाला. हिराबाई महादेव माने (वय ७५, सिद्धनेर्ली, ता. कागल) व दिक्षांत नितीन कांबळे (२८, शहापूर, इचलकरंजी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाघजाई घाटातील एम.एम.जी. गोठ्याजवळ असलेल्या धोकादायक वळणावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कागलकडे निघालेल्या मिनी टेम्पो, त्यामागे दुचाकी व त्यामागे बोलेरो गाडी कागलच्या दिशेने जात असताना समोरून शेंडूरकडून निढोरीच्या दिशेने येणारी उसाची ट्रॅक्टर-ट्राॅलीही समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनावर उलटली. यावेळी झालेल्या तिहेरी अपघातात मिनी टेम्पोमधील महिला हिराबाई महादेव माने, तर दुचाकीवरील दिक्षांत नितीन कांबळे हे दोघे जागीच ठार, तर इतर सहाजण जखमी झाले.
जखमींना कागल व कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात घडलेल्या ठिकाणी ऊस रस्त्यावर पडल्यामुळे वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली.
तसेच अपघात ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर कागलचे पोलीस आणि पोलीस कंट्रोल ११२ चे पोलीस पोहोचल्याने ऊस बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
अपघातातील जखमींची नावे अशी : लक्ष्मण भुर्ले (वय ६५), छबू चंदुकुडे (५०), बबिता भुर्ले (५३), सौजन्या भुर्ले (११), अनिल शिंदे (३६), लताबाई भुर्ले (६५).
नवीन टेम्पोचा अपघात....
अनिल भिवाजी शिंदे हा कागल येथील नगरपालिकेच्या घंटागाडीवर चालक म्हणून काम करीत होता. त्याने नुकताच नवीन मिनी टेम्पो घेतला होता. टेम्पो घेऊन तो नातेवाइकासह बाळूमामा देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन घरी कागलकडे येत असताना वाघजाई घाटात नवीन टेम्पोचा अपघात झाला. यात टेम्पोचा चक्काचूर झाला आहे.