Shivaji University: दोन लाख विद्यार्थी देणार ऑफलाईन परीक्षा, सीमाभागातील विद्यार्थ्यांना सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 11:32 AM2022-05-07T11:32:38+5:302022-05-07T11:38:55+5:30
पेपर सोडविण्यास एका तासाला १५ मिनिटे जादा वेळ परीक्षार्थींना दिला जाणार आहे. दि. १५ जुलैपर्यंत या परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिवाजी विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील विविध ७४० परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २ लाख २० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पेपर सोडविण्यास एका तासाला १५ मिनिटे जादा वेळ परीक्षार्थींना दिला जाणार आहे. दि. १५ जुलैपर्यंत या परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
या परीक्षांबाबतची माहिती प्रशासनाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना शुक्रवारी दिली. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, कोल्हापूरचे विभागीय सहसंचालक हेमंत कठरे उपस्थित होते. या परीक्षार्थींना विद्यापीठ प्रश्नसंच पुरविणार आहे. दोन दिवसआड एक पेपर घेण्यात येणार आहे. अन्य जिल्ह्यांतून परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा विद्यापीठ उपलब्ध करून देणार आहे.
परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सुरू केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार परीक्षांबाबत विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सीमाभागातील विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यांना वसतिगृहाची सुविधा दिली जाणार आहे.
परीक्षा मंडळ संचालक पदासाठी ३ जूनला मुलाखती
कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक नियुक्तीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची सूचना मंत्री सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला केली. त्यावर परीक्षा मंडळाच्या पूर्णवेळ संचालकपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील अर्जांची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया दि. ३ जून रोजी होणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.