अडचणींवर मात करत घाटातून ११० किलोमीटरचा प्रवास -: निपाणी-कणकवली एस.टी.ची ४५ वर्षे अखंड सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:42 AM2019-12-05T00:42:02+5:302019-12-05T21:31:59+5:30
अन्य वाहनांमुळे किंवा अन्य डेपोच्या गाड्यांमुळे या गाडीला प्रवासी कमी मिळत असले तरी निपाणीतून कणकवलीला आणि कणकवलीहून निपाणी, मुरगूड आदी ठिकाणी प्रवास करणारे नेहमीच्या प्रवाशांना ही गाडी म्हणजे अजूनही एक दुवाच आहे.
अनिल पाटील ।
मुरगूड : लांबपल्ल्याच्या किती गाड्या सुरू झाल्या. काही दिवसांनंतर या ना त्या कारणाने त्या बंदही झाल्या पण कोणताही आर्थिक फायद्याचा विचार न करता गेल्या ४५ वर्षांपासून कोकण आणि कर्नाटकाला जोडणारी आणि दळणवळणाचे चांगले माध्यम बनलेली निपाणी-कणकवली ही एस. टी. मात्र अखंडित धावत आहे. अनेक समस्या, अडचणी असतानासुद्धा महामंडळाने या गाडीमध्ये सातत्य ठेवत प्रवाशांची मोठी सोय केली आहे.
निपाणी हे सीमाभागातील हे महत्त्वाचे शहर आहे. या शहरातून पुणे - बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे कर्नाटकातील विविध मोठ्या शहरांचा संपर्क या शहराशी आहे तर कणकवली हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचे, तालुक्याचे मुख्यालय आहे.
साधारण १९७५ च्या सुमारास कणकवली डेपोच्या पुढाकाराने कणकवली आणि निपाणी या एस.टी. बसची सुरुवात करण्यात आली. जंगलातून रस्ता, अत्यंत धोकादायक फोंडा घाट आणि फारसा फायदा होण्याची शक्यता धूसर असतानाही कणकवली डेपोने ही गाडी सुरू करण्याचे धाडस दाखविले. काही दिवसांत या बससेवेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मार्गावरील मुरगूड, मुदाळ तिठ्ठा, राधानगरी, फोंडा आदी ठिकाणावरील प्रवाशांना या गाडीचा फायदा व्हायला लागला.
निपाणी-कणकवली गाडी सुरू होण्यासाठी पुढील तीन कारणे महत्त्वाची होतीच. कोकणात जेवणानंतर पान खाण्याची सवय मोठी होती; पण खाऊची पाने पिकविण्यासाठी योग्य हवामान नव्हते. त्यामुळे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात खाऊची पाने याच कणकवली गाडीतून नेली जायची. टपावर आणि गाडीत पानाच्या मोठ-मोठ्या करंड्या ठेवल्या जायच्या. याशिवाय त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोक कणकवली डेपोमध्ये कामास होते. या कर्मचाऱ्यांची सोय होण्यासाठी ही गाडी मोठा दुवा होती. मुरगूड, गारगोटी, बिद्री परिसरातील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक जेवणाचे डबे, अन्य साहित्य याच गाडीतून पाठवायचे.
कर्नाटकातील म्हैसूर, बंगलोर आदी परिसरातील पर्यटकांना तळकोकणातील मालवण, सिंधुदुर्ग, गोवा आदी ठिकाणी जायचे असल्यास मोठी अडचण निर्माण व्हायची. या गाडीमुळे त्यांची मोठी सोय झाली होती. कणकवलीपासून काही अंतरावर कोकणातील महत्त्वाची पर्यटनस्थळे असल्याने कर्नाटकातील प्रवाशांनी या गाडीला प्रचंड पसंती दिली होती. याच गाडीतून आमसूल, कोकमही मोठ्या प्रमाणात सीमाभागात आणले जायचे. सध्या मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये कोकणातून माशांची वाहतूकही या गाडीतून केली जाते. नेहमीच अत्यंत सुसज्ज गाडी, आपुलकीने प्रवाशांशी संवाद साधणारे चालक-वाहक आणि वेळेचा काटेकोरपणा तसेच सुरक्षित प्रवास यामुळे कणकवली-निपाणी गाडी लोकप्रियतेच्या शिखरावर गेली आहे. कणकवलीमधून रोज दुपारी अडीच वाजता ही गाडी सुटते. ती निपाणीमध्ये साडेसहाच्या सुमारास पोहोचते तर रोज निपाणीतून सकाळी रोज साडेसातला सुटते आणि कणकवलीमध्ये साडेअकराला पोहोचते. सध्याच्या आधुनिकतेचा परिणाम या गाडीवर झाला आहे.
अन्य वाहनांमुळे किंवा अन्य डेपोच्या गाड्यांमुळे या गाडीला प्रवासी कमी मिळत असले तरी निपाणीतून कणकवलीला आणि कणकवलीहून निपाणी, मुरगूड आदी ठिकाणी प्रवास करणारे नेहमीच्या प्रवाशांना ही गाडी म्हणजे अजूनही एक दुवाच आहे.
सीमाभाग आणि कोकण यांच्यात सहसंबंध निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने सन १९७५ च्या सुमारास आम्ही कणकवली-निपाणी ही गाडी सुरू केली. घाटातून रस्ता आणि अंतरही अधिक असल्याने वरिष्ठांनी आढेवेढे घेतले; पण प्रवाशांसह एस.टी.ला फायदा होईल असा विश्वास दिल्याने ही गाडी सुरू झाली. ती लोकप्रिय झाली. सध्या अनेक अडचणी आहेत तरीही ही गाडी कायमपणे सुरू राहावी आणि ऐतिहासिक गाडी म्हणून ती ओळखली जावी. - भिकाजी मांडवे,
कणकवलीचे तत्कालीन डेपो मॅनेजर.
पंचेचाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या गाडीवर मला चालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. घाटरस्ता असल्याने जबाबदारी मोठी आहे. याअगोदरच्या चालकांची आणि वाहकांची कामगिरी चांगली असल्याने आम्ही जबाबदारीने वागतो. सध्या राधानगरी डेपोमधून राधानगरी-मुदाळतिठ्ठा आणि मुदाळतिठ्ठा-निपाणी अशा जादाच्या फेऱ्या सुरू केल्याने प्रवासीसंख्येवर थोडा परिणाम दिसतो; पण अजूनही प्रवासी याच गाडीला पसंती देतात.
- युवराज पाटील, चालक कणकवली निपाणी एस.टी.