हुपरीत १० वर्षे काम करूनही पाईप लाईन पाण्याच्या प्रतिक्षेत; ठेकेदारावर काय कारवाई करणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:32 AM2019-07-25T00:32:16+5:302019-07-25T00:37:18+5:30
जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा ठेकेदाराची निष्क्रियता व निष्काळजीपणा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आदी कारणामुळे हाच खर्च आत्ता दुप्पट होण्याच्या मार्गांवर आहे.
तानाजी घोरपडे ।
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने तब्बल दहा वर्षे सुरू आहे. योजनेचा मूळ खर्च ११ कोटी ४० लाख रुपये होता. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा ठेकेदाराची निष्क्रियता व निष्काळजीपणा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आदी कारणामुळे हाच खर्च आत्ता दुप्पट होण्याच्या मार्गांवर आहे.
याबाबतचे सोयरसुतक ना जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना आहे ना ठेकेदाराला. योजनेच्या दुसºया टप्प्यातील जलकुंभ उभारणी व शहरांतर्गत जलवाहिनी टाकणे आदी कामाबाबत मोठ्या प्रमाणात गंभीर तक्रारी असतानासुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन याच ठेकेदाराला तब्बल सहावेळा नियमबाह्य मुदतवाढ दिली आहे.
एक महिन्याच्या आत पाणीपुरवठा योजनेचे काम गतिमान झाले न्हाई तर संबंधित ठेकेदारावर व जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करू, असा इशारा उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे व नगरसेवक दौलतराव पाटील यांनी पाणीपुरवठा समितीच्या बैठकीतच दिला आहे.
योजनेच्या कामातील अडथळे दूर करुन गती प्राप्त व्हावी यांसाठी कुणीही प्रयत्नशील असल्याचे दिसून येत नाही. गेली दहा वर्षे पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले असून ठेकेदार इकडे फिरकतही नाही. त्याच्यावर काय कारवाई केली, असा जाब विचारत नगरसेवकानी आता आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे समोर येत आहे. योजनेचे दोन जलकुंभ मुख्य जलवाहिनीला जोडणे तसेच शहारांतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करणे.आदी कामे युद्धपातळीवर करावीत ही कामे वेळेत नाही झाल्यास संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई दंड आणि त्याचे नाव काळ्या यादीत टाकणे यांसाठी आत्ता पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी व जीवन प्राधिकरण अधिकारी यांनी प्रयत्नच केले नाहीत.त्यामुळे योजनेचे काम रखडले आहे. योजनेचा खर्चही दुप्पट होऊ शकतो, याला जबाबदार कोण; असा प्रश्न शहरवासीय सध्या उपस्थित करू लागले आहेत.
हुपरी शहरासाठी दूधगंगा नदीवरून राबविण्यात येत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या दुसºया टप्प्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. शहराच्या विविध भागांत जलकुंभ उभारणी करणे व शहरांतर्गत जलवाहिनी टाकणे हिकामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत.शहरांत सुलभ पाणी वितरण व्हावे यांसाठी सुमारे ४४ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत केवळ ९ किलोमीटरच जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाबाबत शहरवासीयांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. काहींनी काम थांबविले तर काहींंनी कामात सुधारणा व्हावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.