वाहनचालकांना वीस कोटींचा गंडा
By Admin | Published: February 16, 2015 10:13 PM2015-02-16T22:13:20+5:302015-02-16T23:10:38+5:30
ऊसतोडणी मुकादमांकडून फसवणूक : जिल्ह्यातील सुमारे सव्वादोनशे वाहनमालकांचा समावेश
खोची-आयुब मुल्ला - कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड वाहनचालकांना ऊसतोडणी मुकादमांनी सुमारे २० कोटी रुपयांना गंडा घातल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना हा सिझन आर्थिकदृष्ट्या फटका देणारा ठरला आहे. यामध्ये जवळपास सव्वादोनशे ऊस वाहतूक वाहनमालकांचा समावेश आहे. यास शासन अन् कारखानदारही जबाबदार नसल्याने स्वत:च्या हिमतीवरच त्यांना ही रक्कम वसूल करावी लागणार आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वीपासून ऊतोडणी मजुरांची टोळी करतो म्हणून वाहनचालकांककडून पैसे घेऊन तोडणीस मजूरच न आणण्याचे प्रमाण मुकादमांकडून होत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक होतानाचे चित्र दिसत आहे. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकाराची २० कोटींची फसवणूक होऊन वाहनमालकांना चांगलाच गंडा घातला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून हळूहळू या संदर्भातील चित्र समोर येऊ लागले. त्यातूनच ही माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात २१ पैकी पंधरा सहकारी, तर सहा खासगी साखर कारखाने आहेत. यामध्ये २५०० पासून ९००० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेले कारखाने आहेत. २५०० मे. टन क्षमता असलेल्या कारखान्याला ४०० ऊसतोड मजुरांच्या टोळ्या लागतात. सर्वसाधारणपणे हा सर्व व्यवसायाचा भाग म्हणून अभ्यास केला. फसवणुकीचे प्रमाण हे जास्त आहे. अनेक कारखान्यांनी याबद्दल माहिती देण्यास असमर्थता दाखविली आहे; परंतु पाच टक्क्यांची फसवणूक ही गृहितच धरली, तर नुकसानीचा अंदाज समोर येतो. प्रत्येक टोळीला आठ लाख रुपये इतका जवळपास अॅडव्हान्स दिल्याचे समजते. त्यामुळे अंदाज गृहीत धरून १६ कारखान्यांच्या प्रती दहा टोळ्या आल्याच नाहीत, असा हिशोब केला, तर फसवणुकीचा आकडा १३ कोटी रुपयांपर्यंत जातो. यामध्ये जादाची वाढ निश्चित आहे. त्यामुळे हा आकडा १५ कोटी सहज आहे. उलट पाच कोटी सहा लाखांची फसवणूक झाल्याची माहिती जिल्ह्यातील चार कारखान्यांच्या वाहनमालकांनी दिली आहे.
२० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सर्वच कारखाना क्षेत्रातील चित्र समोर येते. हे पैसे अॅडव्हान्स वाहनमालकांनी मुकादमला दिलेले आहेत. पूर्वी साखर कारखाने हमीपत्र देत त्यामुळे बॅँका अॅडव्हान्स देण्यासाठी पैसे उपलब्ध करून देत. आता मात्र स्वत:च्या मालमत्तेवर कर्ज काढून वाहनमालकांनी अॅडव्हान्ससाठी पैसे दिले आहेत. ते आता कसे वसूल करायचे असा प्रश्न फसवणूक झालेल्या वाहनधारकांसमोर आहे. चालू हंगामात अल्पमजुरांवर कसे-बसे तोडणी वाहतुकीचे काम वाहनधारक करीत आहेत; परंतु अपेक्षित व्यवसाय झालेला नाही. त्यामुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. शासन, कारखानदार यांनी वाहनधारकांना सहकार्य करीत फसवणुकीचा प्रकार होणार नाही यासाठी कायदेशीर अटींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कारखानानिहाय तपशील
कारखान्याचे नाववाहनमालकांची संख्याथकबाकी रक्कम रु. लक्ष
१) छ. राजाराम, बावडा १७ ९१
२) छ. शाहू, कागल ५३ २०७
३) शरद साखर, नरंदे २२ १७४
४) दत्त, शिरोळ २६ २३४