शेअर मार्केटमध्ये फायद्याचे आमिष दाखवले, मलेशियातील महिलेने कोल्हापूरच्या व्यावसायिकाला २० लाखाला गंडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:02 PM2022-07-29T16:02:25+5:302022-07-29T16:25:27+5:30
विविध राज्यांत खात्यावर पैसे भरले
कोल्हापूर : शेअर मार्केटिंग कंपनीत गुंतवणूक करा, मोठा फायदा मिळवून देतो, असे आमिष दाखवून राजारामपुरीतील एका बेकरी व्यावसायिकाला मलेशियातील एका महिलेने तब्बल वीस लाखांचा गंडा घातला. याबाबत उदय विठ्ठल माळी (वय ५० रा. टाकाळा मेन रोड, राजारामपुरी ४ थी गल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात रिका लिम (रा. मलेशिया) यांच्यावर गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उदय माळी त्यांच्या मोबाइलवर रिका लिम या महिलेने दि. २२ मार्च ते दि. ३० मे या कालावधीत वेगवेगळ्या सहा मोबाइल क्रमांकावरून व्हॉटसॲपवर मेसेज पाठवले. त्यामध्ये, आपण मलेशियात राहत असून, सिंगापूर येथे मुख्य शाखा असलेली जागतिक दर्जाची शेअर मार्केटिंग कंपनी आहे. कंपनीमध्ये आपण भारत व मलेशिया या दोन देशांसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम करते. कंपनीत ऑनलाइन डायमंड व प्लास्टिक कमोडीटीचे शेअर्स व लॉटस खरेदीचा व्यवहार चालतो. तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देते, असे सांगून माळी यांचा विश्वास संपादन केला.
त्यांनतर महिलेने माळी यांना वेबसाइट पाठवली. त्यावर खाते उघडून व्यवहार करा, भरपूर फायदा मिळवून देते, असे आमिष दाखवले. माळी यांनी खाते उघडून प्रथमदर्शनी ५० हजारांची गुंतवणूक केली. त्यानंतर विविध बँक खात्यावर त्यांनी २० लाख २ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मोबदल्यात खात्यावर रक्कम ४० लाख ४४ हजार ३०० रुपयांपर्यंत वाढली.
दरम्यान, माळी यांनी दि. २५ मे रोजी संशयित रिका लिम यांना फोन करून पैसे काढणार असल्याचे सांगितले. संशयिताने त्यांना बोनसचे आमिष दाखवल्याने रक्कम काढली नाही. पुन्हा माळी यांनी दि. ३० मे रोजी पैसे काढण्यासाठी वेबसाइट ओपन केली; पण ती बंद असल्याचे दिसून आले. तसेच संशयित रिका लिमचा संपर्क झाला नाही. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत गुरुवारी फसवणुकीची तक्रार नोंदवली. याबाबत पुढील तपास पो.नि. ईश्वर ओसामे करत आहेत.
विविध राज्यांत खात्यावर पैसे भरले
संशयित रिका लिम या महिलेने वेबासाइटवरून दिलेल्या थिरीसूर (केरळ), कोईमतूर, रांची (झारखंड), कोलकत्ता, उत्तरप्रदेश येथील बँक खात्यावर माळी यांनी तब्बल २० लाख २ हजार रुपये भरले.