पाच रुपयांमध्ये मिळणार वीस लिटर शुद्ध पाणी- जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये ‘वॉटर एटीएम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:11 AM2019-01-04T01:11:32+5:302019-01-04T01:13:13+5:30
केवळ एक रुपयामध्ये एक लिटर आणि पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देणारे प्रकल्प कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उभारले जात आहेत
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : केवळ एक रुपयामध्ये एक लिटर आणि पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देणारे प्रकल्प कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या वतीने उभारले जात आहेत. ५१ गावांमध्ये ७१ ठिकाणी हे प्रकल्प उभारले जात असून, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी निधी देण्यात आला आहे.
अनेक गावांमध्ये विविध कारणांनी पाणी दूषित होत असल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी ही योजना आखण्यात आली असून, या प्रकल्पांची उभारणी करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या यांत्रिकी विभागाकडे देण्यात आले आहे.
सामाजिक न्याय विभागाने यासाठी २०१७/१८ साली २ कोटी २ लाख; तर जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून ३७ गावांमधील अनुसूचित जाती जमाती वस्तींमध्ये ५२ ठिकाणी; तर नियोजनच्या निधीतून १४ गावांमध्ये १९ ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्या गावामधील किंवा वस्तीमधील १०० चौरस फुटांची जागा, पाणीपुरवठा आणि विजेची सोय उपलब्ध झाल्यानंतर तेथे या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. एका प्रकल्पासाठी ३ लाख ३ हजार रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे.
या प्रकल्पातून प्रतितास २५० लिटर शुद्ध पाणी मिळणार असून १ लिटरसाठी एक रुपया आणि २० लिटरसाठी पाच रुपयांचे नाणे या यंत्रामध्ये टाकावे लागणार आहे. यातून जे पैसे जमा होणार आहेत, ते यंत्रणा उभारणाºया ठेकेदाराला दिले जाणार असून त्यांच्या कंपनीनेच तीन वर्षे या प्रकल्पाची देखभाल करायची आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्यायचे उपायुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात असल्याचे ‘यांत्रिकी’चे उपअभियंता उत्तम थोरात यांनी सांगितले.
या गावांना लाभ
शिरोळ : धारवाड, घालवाड, लाटवाडी, शिरदवाड, हेरवाड, तमदलगे, खिद्रापूर, तेरवाड.
हातकणंगले : खोतवाडी, तारदाळ, लक्ष्मीवाडी, आळते, नेज, रेंदाळ, नरंदे, घुणकी, कबनूर, कोरोची, चावरे.
करवीर : कणेरी, दिंडनेर्ली, गडमुडश्ािंगी, वळीवडे, वसगडे, निगवे खालसा, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, चिंचवाड.
आजरा : चाफवडे, सातेवाडी, वडकशिवाले, लाटगाव, सोहाळे, मलिग्रे.
गडहिंग्लज : बड्याचीवाडी, कडगाव, कौलगे, कवळीकट्टी, दुंडगे, नेसरी.
भुदरगड : खानापूर, कोळवण, भाटिवडे.
चंदगड : सरोळी, गवसे.
कागल : साके,सिद्धनेर्ली
राधानगरी : सावर्डे, पाटणकर.
पन्हाळा : पडळ, मसूदमाले
यातील काही गावांमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांनी हा प्रकल्प नको असे लिहून दिले आहे.