भय्या मानेंसह २० जणांवर गुन्हा
By admin | Published: September 18, 2016 12:19 AM2016-09-18T00:19:44+5:302016-09-18T00:38:27+5:30
नायब तहसीलदारांची तक्रार : कागलच्या तहसीलदार कार्यालयात दंगा केल्याचा आरोप
कागल : तहसीलदार कार्यालयात तहसीलदार आणि तलाठ्यांची बैठक सुरू असताना तेथे दंगा करून शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा राष्ट्रवादीच्या कागल शहरातील २० कार्यकर्त्यांवर शनिवारी दाखल झाला. नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांनी ही तक्रार दिली आहे.
जिल्हा बँकेचे संचालक भय्यासाहेब माने, नगरसेवक प्रवीण गुरव, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, सुनील कदम, प्रवीण काळबर, सतीश गाडीवड्ड, योगेश चौगुले, संग्राम सणगर, विवेक लोटे, पप्पू कुंभार, गणेश सोनुले, युवराज माळी, राहुल गाडेकर, राकेश वाघमारे, प्रशांत जाधव, सचिन सोनुले, बच्चन सोनुले, प्रवीण दावणे, अनिल शिंगाडे, प्रशांत हेगडे (सर्व रा. कागल) यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, तहसीलदारांच्या केबिनमध्ये सकाळी १०.३० वाजता २९ तलाठी आणि ६ मंडल अधिकाऱ्यांची शासकीय बैठक सुरू होती. त्यावेळी भय्या माने या ठिकाणी आले. तहसीलदारांनी तुमच्याशी एक तासांनी बोलतो, असे म्हटल्यावर ते परत गेले. त्यानंतर १२.३० वाजता २० हून अधिक कार्यकर्ते घेऊन आले. बैठकीत घुसून तहसीलदारांशी उद्धट वर्तन करीत शिवीगाळ केली. प्रवीण गुरव यांनी बघून घेण्याची धमकी दिली. निराधार योजनेच्या पेन्शनचे पैसे चुकीच्या पद्धतीने वाटले जात आहेत, असे म्हणत एका खासगी कर्मचाऱ्यास मारहाण केली. (प्रतिनिधी)
न्याय कोणाकडे मागायचा : भय्या माने
दरम्यान, प्रताप ऊर्फ भय्या माने यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून त्यामध्ये म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनची रक्कम चुकीच्या पद्धतीने लोकांच्या घरात जाऊन देण्याचा प्रकार कागलमध्ये सुरू होता. तो तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेथे आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली आहे. जाणीवपूर्वक आम्हाला ‘टार्गेट’ केले आहे. याबद्दल आम्ही योग्य ठिकाणी न्याय मागणार आहोत. यापूर्वी केलेल्या तक्रारीची दखल तहसीलदारांनी घेतलेली नाही. तहसीलदारच अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा?