गोकुळ शिरगावमध्ये २० टन ‘मॅगी’ जप्त
By admin | Published: June 5, 2015 01:05 AM2015-06-05T01:05:14+5:302015-06-05T01:08:35+5:30
३२ लाख रुपये किंमत : ‘अन्न व औषध’ची कारवाई
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथून मॅगीचा ३२ लाख रुपये किमतीचा २० टन ३५ किलो सीलबंद साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी रात्री उशिरा जप्त केला.
या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘गोकुळ शिरगाव येथील परदेशी अॅँड सन्स हे ‘टू मिनिट मॅगी नूडल्स’चे कोल्हापूर जिल्ह्याचे वितरक आहेत. मॅगी नूडल्सचे विविध प्रकारचे एकूण १६ नमुने तपासणीसाठी घेऊन सुरक्षिततेचा उपाय म्हणून परदेशी यांचा मॅगीचा सर्व साठा जप्त केला. जिल्ह्यामध्ये वितरकांनी विक्री केलेल्या विविध विक्रेत्यांकडील मॅगीचा साठा परत घेण्याच्या सूचना केल्या आहेत, जेणेकरून अहवाल येईपर्यंत पूर्ण जिल्ह्यातील मॅगीची विक्री बंद राहील. परदेशी अॅँड सन्स यांनी मॅगीचा पुरवठा पूर्णपणे थांबवावा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षानुसार विक्रेते, पुरवठादार व उत्पादक यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) संपत देशमुख, सुकुमार चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत, महेंद्र पाटील, अभिनंदन रणदिवे, बिभीषण मुळे, नमुना सहायक सतीश माने, आदींनी केली. देशभर मॅगी जप्तीची कारवाई होत असताना कोल्हापुरात काहीच हालचाली होत नव्हत्या. त्याबद्दल माध्यमांतून टीका झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाला जाग आली व त्यानंतर उशिरा का असेना, या विभागाने ही कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)