उदय सामंत यांच्याकडून कोल्हापूरसाठी २० व्हेंटिलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:11+5:302021-06-09T04:31:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपकरणांची कमतरता पाहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपकरणांची कमतरता पाहून राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी २०व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. सामंत यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे हे व्हेंटिलेटर सुपुर्द करण्यात येणार आहेत.
सामंत हे सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले आहेत. सकाळी १० वाजता ते शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे ते कोल्हापूरचे संपर्कप्रमुख असल्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा विषय त्यांच्यासमोर निघणार आहे. सध्या शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तीनही पदाधिकारी राजीनामा देण्यास टाळाटाळ करत असल्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अस्वस्थता आहे. यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ते कोरोना स्थितीचा आढावा घेणार असून याचवेळी जिल्हा प्रशासनाला हे व्हेंटिलेटर प्रदान करण्यात येणार आहे.