जलयुक्त शिवारासाठी झटताहेत २० गावे
By Admin | Published: January 29, 2015 11:47 PM2015-01-29T23:47:45+5:302015-01-29T23:54:41+5:30
कागल तालुका : जलसमृद्धीकडे वाटचाल; नाला बंधारे, मातीसह सिमेंट नाल्यातील गाळ काढणे सुरू
दत्तात्रय पाटील -म्हाकवे -कमी-अधिक प्रमाण, बदललेले कालमान यामुळे भविष्यात पाणीटंचाईस सामोरे जावे लागू नये या हेतूने शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बृहत् आराखडा आखला आहे. या अभियानाला कागल तालुक्यातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २० हून अधिक गावांमध्ये लोकसहभागातून सिमेंट नाला बंधारे बांधणे, मातीसह सिमेंट नाल्यातील गाळ काढण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
काळम्मावाडी धरणासह चिकोत्रा, सर्फनाला, पारगाव, आदी धरणांच्या माध्यमातून दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा नदींसह उजव्या कालव्यातून बारमाई पाणी वाहत आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी शेती-शिवार हिरवाईने नटला आहे. मात्र, अद्यापही शेकडो हेक्टर जमीन पाण्याअभावी पडीक राहिली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून पाणीसाठा (वॉटर बॅँक) वाढविण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ सरसावले आहेत.
नंद्याळ (ता. कागल) येथे कृषी विभागामार्फत सिमेंट नाला बंधारे मंजूर झालेल्या कामाला सुरुवात झाली आहे, तर सोनाळी, चौंडाळ, जैन्याळ, माद्याळ, केनवडे, क।। सांगाव, दौलतवाडी, सावर्डे खुर्द येथील सिमेंट नाल्यातील गाळ काढण्याची कामे
सुरू आहेत, तर करड्याळ येथील
माती नाल्यामध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले आहे.
या कामासाठी लोकवर्गणीतून जेसीबी मशीन आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये मातीवजा गाळ टाकायचा आहे, त्यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे.
त्याचबरोबर गलगले, बामणी, म्हाकवे, मेतगे, वंदूर, यमगे, आदी गावांमध्ये वनराई बंधाऱ्याची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यात जलसमृद्धीमध्ये भर पडणार आहे.
‘शासनाने केलेल्या आवाहनांना प्रतिसाद देत तालुक्यातील गावांनी समृद्धी पर्वालाच सुरुवात केली आहे. बंधाऱ्यातील अनेक वर्षांपासून साचलेला गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर या बंधाऱ्यातील पाणीसाठा दुपट्टीने वाढणार आहे. तसेच बंधाऱ्याच्या खालील भागातील विहिरींची पाणीपातळीही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे अभियान शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.
-दीपक चव्हाण, गटविकास अधिकारी, कागल.