शहरात २० ‘वॉटर एटीएम’
By admin | Published: April 24, 2015 01:31 AM2015-04-24T01:31:06+5:302015-04-24T01:31:06+5:30
स्थायी सभेत निविदा मंजूर : वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्यांची बदली होणार
कोल्हापूर : शहरात २० ठिकाणी एक रुपयात स्वच्छ एक लिटर पाणी देणारी ‘वॉटर एटीएम मशीन’ बसविण्यात येणार आहेत. ‘अॅक्वाक्रॉप्ट’ कंपनीतर्फे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून मिळणाऱ्या एक रुपयातून कंपनी सर्व खर्च पाहणार आहे. महापालिका फक्त जागा व पाणीपुरवठा करणार आहे. या योजनेस गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील पाणीपुरवठा विभागाचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती आदिल फरास होते.
पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागातील उपसा करणारी यंत्रणा जुनी असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्ची पडते. उपसा केंद्रातील मशिनरींचे ऊर्जा परीक्षण करण्याचा निर्णय स्थायी बैठकीत घेण्यात आला. खासगी कंपनीद्वारे हे परीक्षण करण्यात येणार असून त्यानंतर कंपनीद्वारे नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. नवीन यंत्रणेनंतर होणाऱ्या वीज बचतीच्या पैशांतून सर्व खर्च भागविला जाणार आहे. या योजनेस स्थायी समितीने मंजुरी दिली.
वॉटर एटीएम मशीन व ऊर्जा परीक्षणानंतर कार्यान्वित होणाऱ्या यंत्रणेचा महापालिकेवर एक रुपयांचा बोजा पडणार नाही. उलट शहरवासीयांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळेल, असे आदिल फरास यांनी सांगितले. महापालिकेच्या विविध विभागांत अनेक कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करत आहेत. त्यांची इतरत्र बदली करून इतर विभागही सक्षम करावेत, ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदलीचा ठराव बैठकीत झाला.