Lok Sabha Election 2019 २० वर्षे पदे भोगली, आता म्हणे, राष्ट्रवादी चोरांची गुहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:22 AM2019-04-12T00:22:53+5:302019-04-12T00:23:12+5:30
राजाराम लोंढे / नसीम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : तुमच्या आजोबांची हयात काँग्रेसमध्ये गेली. आई राष्ट्रवादीमुळेच खासदार ...
राजाराम लोंढे / नसीम सनदी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तुमच्या आजोबांची हयात काँग्रेसमध्ये गेली. आई राष्ट्रवादीमुळेच खासदार झाली व तुम्ही स्वत:ही राष्ट्रवादीमुळेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाला. गेली वीस वर्षे ज्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये राहून सत्तेची सर्व पदे भोगली, तोच पक्ष तुम्हाला आता चोरांची गुहा असल्याची उपरती कशी काय झाली? असा पलटवार खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर केला.
जोपर्यंत स्वाभिमानी शेतकऱ्यांची फौज माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कोणी पराभूत करू शकत नाही. मला पराभूत करण्याचे नरेंद्र मोदी यांचे आदेश असल्याचे सांगणारे चंद्रकांत पाटील, तुमच्याबरोबर थेट मोदींनाच ‘हातकणंगले’त आणून बसवा, असे आव्हान शेट्टी यांनी दिले.
चंद्रकांत पाटील तुमच्या फायली तयार!
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कारनाम्याचे सगळे पुरावे आणि फायली माझ्याकडे तयार आहेत. योग्यवेळी तक्रार करणारच आहे; पण जनताजनार्दन सर्वश्रेष्ठ असते. जनतेसमोरच सोक्षमोक्ष व्हायला हवा, म्हणून बिंदू चौकात यावे. अनेकांना ते तुरुंगाची भीती घालत आहेत; पण त्यांच्यावरच ही वेळ येणार असून जामिनासाठी त्यांना फिरावे लागेल, तो दिवस लांब नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
हितचिंतक की विरोधक हे सांगा
शरद पवार काट्याने काटा काढतात, ते शेट्टींचाही काटा काढतील, या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबद्दल विचारले असता, ते माझे हितचिंतक की विरोधक हे त्यांनी आधी सांगावे. मला पराभूत करण्याचा नरेंद्र मोदी यांचा आदेश आहे. मग पवार जर मला पराभूत करत असतील तर तुम्हाला का वाईट वाटते? असा सवाल शेट्टी यांनी केला.
प्रश्न : दूध, ऊस आंदोलनाच्या पलीकडे आपण मतदारसंघात काहीच केलेले नाही?
उत्तर : आरोप करणाºयाच्या घरात
३५ वर्षे खासदारकी होती, त्यांनी काय दिवे लावले? मी नागपूर-रत्नागिरी मार्गाला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळवून दिला, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्गास मंजुरी, मिरज-पुणे विद्युतीकरण व दुहेरीकरण केले, ८०० गावांत स्वनिधीतून कोट्यवधींची कामे केलीत. हा विकास नव्हे का? संघटनेच्या ऊसदराच्या चळवळीमुळे लोकांची क्रयशक्ती, राहणीमान वाढले, हातात पैसा आल्यामुळे पायाभूत सुविधा वाढल्या, हा विकास नव्हे का..?
प्रश्न : पुलवामाचा मुद्दा करून शहीद जवानांच्या नावावर भाजप मते मागत आहे?
उत्तर : ‘सीआरपीएफ’, ‘बीएसएफ’चे जवान पुलवामा हल्ल्यात शहीद झाले; पण त्यांना शहिदांचा दर्जा दिला नाही. मग आता त्यांच्या नावावर मते मागताना ५६ इंचांची छाती कुठे जाते? शहिदांचे नाव घेऊन मते मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
प्रश्न : आयुष्यभर संघर्ष केलेल्या साखरसम्राटांच्या मांडीला मांडू लावून बसल्याची टीका होते?
उत्तर : माझ्यावर हे आरोप करणाऱ्यांच्या कळपात २०० पैकी १२५ साखर कारखानदार आहेत; मग तुमचा कळप कोणता? भले मला कोणी अहंकारी म्हणो; पण शेतकºयांच्या प्रश्नांवर कोणालाही अंगावर घेण्याची माझ्यात धमक आहे. मी ज्यांच्या कळपात गेलो त्यांच्याकडून एफआरपी वसूल केली; पण तुमच्यासोबत असलेल्या कारखानदारांनी किती एफआरपी व बॅँका बुडविल्या, याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावे. बोगस कर्जे काढणाºया सहकारमंत्र्यांवर कारवाईची हिंमत दोन नंबरच्या मंत्र्यांनी दाखवावी.
प्रश्न : प्रतिस्पर्धी उमेदवाराचे आव्हान कितपत वाटते?
उत्तर : ज्यांना स्वत:चे कर्ज फेडता आले नाही, कंपनी नीट चालविता आली नाही. त्यांच्या विकासाची दृष्टी आलास, पट्टणकोडोली परिसरातील जनतेने बघितली आहे. भाषणाने क्रांती झाली असती तर नाना पाटेकर, अमिताभ बच्चन हे नेते झाले असते.
प्रश्न : सदाभाऊ खोत तुमच्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत?
उत्तर : ही व्यक्ती गांभीर्याने घ्यावी, या पात्रतेची राहिलेली नाही. तिला जनताच उत्तर देईल.
प्रश्न : या निवडणुकीत तुम्ही कोणता अजेंडा घेऊन जाता?
उत्तर : शेतकºयांना दीडपट हमीभाव, कर्जमाफी, गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार, हा आमचा जाहीरनामा आहे. विरोधक पुलवामासारख्या घटनेतून डोके भडकावून मते मागत आहेत; पण या सर्वांपेक्षा भुकेची आग मोठी असते, ती स्वस्थ बसू देत नसते, याचा विसर भाजपला पडला आहे.