लोकअदालतीत मिनिटाला दोनशे खटले निकाली; विक्रमी ६० हजार ८१७ खटल्यांमध्ये तडजोड, ७५ कोटी १४ लाख ८४ हजार ४८१ रुपयांची वसुली
By उद्धव गोडसे | Published: September 10, 2023 04:34 PM2023-09-10T16:34:15+5:302023-09-10T16:34:28+5:30
न्यायालयाच्या कामकाजाबाबत तारीख पे तारीख हा फिल्मी डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. पण, हे विधान कालबाह्य ठरविण्याची किमया राष्ट्रीय लोकअदालतीने साधली.
कोल्हापूर : न्यायालयाच्या कामकाजाबाबत तारीख पे तारीख हा फिल्मी डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. पण, हे विधान कालबाह्य ठरविण्याची किमया राष्ट्रीय लोकअदालतीने साधली. शनिवारी (दि. ९) जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये झालेल्या लोकअदालतीत ३७ पॅनल्सवर सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत तब्बल ६० हजार ८१७ खटले तडजोडीने निकालात निघाले. दर मिनिटाला २०२ प्रकरणे निकाली काढून लोकअदालतीने नवा विक्रम प्रस्थापित केला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या सूचनेनुसार, शनिवारी जिल्हा न्यायालयासह सर्व दिवाणी न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, मोटार अपघात न्यायाधिकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या एकूण ३७ पॅनल्सवर लोकअदालतीचे कामकाज झाले. यात न्यायालयांमध्ये दाखल असलेली दिवाणी, फौजदारी आणि कौटुंबिक वादाची प्रकरणे तसेच बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या, ग्रामपंचायत, महापालिका, मोबाइल कंपन्यांच्या थकीत वसुलीची दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. सकाळी दहा वाजता जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते अदालतीचे उद्घाटन झाले.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ६० हजार ८१७ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. आजवरच्या कामकाजात प्रथमच विक्रमी खटले निकाली निघाले. पाच तासांत दर मिनिटाला सरासरी २०२ खटले निकाली निघाले. दाखल आणि दाखलपूर्व प्रकरणांमधून ७५ कोटी १४ लाख ८४ हजार ४८१ रुपयांची वसुली झाली. सर्व न्यायाधीश, वकील, प्रभारी प्रबंधक, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे लोकअदालतीचे कामकाज सुलभ आणि गतीने झाले, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश प्रीतम पाटील यांनी दिली.