व्हॉटस् ॲपद्वारे वीज यंत्रणेच्या २०० तक्रारी, महावितरणकडून निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 04:15 PM2020-09-08T16:15:31+5:302020-09-08T16:19:43+5:30
धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आल्यानंतर सोमवार (दि. ७)पर्यंत पुणे प्रादेशिक विभागात २०० ठिकाणच्या वीजयंत्रणेची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दुरुस्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर : धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आल्यानंतर सोमवार (दि. ७)पर्यंत पुणे प्रादेशिक विभागात २०० ठिकाणच्या वीजयंत्रणेची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दुरुस्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ६२ तक्रारींचा समावेश आहे. महावितरणकडून वीज सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खुदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, रोहित्रांचे कुंपण उघडे असणे अशा वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७८७५७६९१०३ हा व्हॉटस् ॲप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात व्हॉटस् ॲपद्वारे आतापर्यंत ६४ ठिकाणी वीजयंत्रणा धोकादायक असल्याची माहिती प्राप्त झाली. महावितरणच्या संबंधित कार्यालयांकडून ६२ ठिकाणचे दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहेत.
उर्वरित २ ठिकाणी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, शिफ्टिंगची गरज परंतु जागेची अडचण आदींमुळे सध्या कार्यवाही सुरू आहे. वीज वितरण यंत्रणेतील धोके कमी करण्यासाठी व्हॉटस् ॲप क्रमांकावर माहिती देण्याच्या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
व्हॉटस् ॲपच्या मोबाईल क्रमांकावर फक्त वीज यंत्रणेपासून धोका असल्याची फोटोसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना कॉल करू नये. फक्त धोकादायक यंत्रणेचे स्थळ संपूर्ण पत्यासह किंवा गुगल लोकेशनसह द्यावे. ज्या नागरिकांकडे व्हॉटस् ॲप नाहीत त्यांनी एसएमएसद्वारे पत्त्यासह माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच अशा तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधून माहिती देता येईल.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी असलेल्या ७८७५७६९१०३ या व्हॉटस् ॲप क्रमांकावर प्राप्त झालेली धोकादायक यंत्रणेची फोटोसह माहिती किंवा तक्रार तत्काळ संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहे. यंत्रणेची दुरुस्ती झाल्यानंतरचे छायाचित्र पाठवून संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येत आहे. या उपक्रमाचे अनेक ग्राहकांनी केले असून तक्रारींनुसार दुरुस्ती कामे लगेचच पूर्ण केल्याबाबत व्हॉटस् ॲपवर समाधान व्यक्त करत आहेत.