पाच वर्षांच्या चिमुरड्याला २०० देश, राज्ये, त्यांच्या राजधान्या तोंडपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:30+5:302021-04-12T04:22:30+5:30
मुरगूड (अनिल पाटील ) : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला, शाळांना सुटी देण्यात आली. अनेकांनी या काळात टीव्ही, मोबाईलला ...
मुरगूड (अनिल पाटील ) : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला, शाळांना सुटी देण्यात आली. अनेकांनी या काळात टीव्ही, मोबाईलला मित्र केले. पण शिंदेवाडी ता. कागल येथील साडेपाच वर्षांच्या अजिंक्य अरुण मोरबाळे या चिमुरड्याने तब्बल सव्वादोनशे देश, राज्ये आणि त्यांच्या राजधान्या तोंडपाठ केल्या. अवघ्या चार मिनिटात तो सर्व राजधान्या फडाफड सांगतो.
सहा महिन्यांपूर्वी या पाच-साडेपाच वर्षांच्या अजिंक्यचा दिनक्रम सर्वसामान्य मुलांसारखाच. खेळण्या-बागडण्याचे त्याचे वय. पण कोरोना महामारीच्या संकटकाळात त्याच्यातील असामान्य प्रतिभेचा आविष्कार पालकांना दिसून आला. अजिंक्यच्या कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या काय करावे, हा इतरांसारखाच सतावणारा प्रश्न. मोबाईलवरील छत्तीसगडच्या एका मुलीच्या व्हिडिओतून त्यांना याचे उत्तर मिळाले. ही मुलगी अवघ्या काही मिनिटात जगभरातील १४५ देशांच्या राजधान्या अस्खलितपणे सांगत होती. या व्हिडिओनेच या कुटुंबियांना प्रेरणा दिली आणि त्यातूनच सुरू झाला अजिंक्यच्या बुद्धिमत्तेचा नवा प्रवास.
शेती सेवा केंद्र चालविणारे अजिंक्यचे वडील अरुण मोरबाळे, चुलते कृष्णात मोरबाळे व गृहिणी असलेल्या आईने एका डायरीत जगातील २३१ देशांपैकी १८१ देशांच्या राजधान्यांसह भारतातील २९ राज्यांच्या राजधान्या लिहून काढल्या. पाठांतरासाठी अजिंक्यची मानसिक तयारी करवून घेतली. सुरुवातीला अवघड गेले, पण अजिंक्यची पाठांतराची आश्चर्यकारक क्षमता बघून कुटुंबीयांना हुरूप आला आणि येथूनच सुरू झाला अजिंक्यच्या पाठांतराचा प्रवास.
सतत तीन महिने अजिंक्यच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडून या सर्वाचे पाठांतर करून घेतले. सुरुवातीपासून अजिंक्यने दिलेल्या प्रतिसादामुळे या कुटुंबीयांचे मनोधैर्य उंचावले आणि बघता बघता अजिंक्य सगळे मुखोद्गत सांगू लागला. अनेक देश आणि त्यांच्या राजधान्यांची नावे उच्चारण्यास अवघड आहेत. पण अवघ्या साडेचार मिनिटात अजिंक्य अचूकपणे आणि आत्मविश्वासाने सारे सांगत राहतो, कशाही क्रमाने. नुकतेच त्याने मुरगूड शहर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर पाठांतराचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले.
चौकट -
तयारी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी...
भारतात अशा प्रकारचा उपक्रम यशस्वी केलेली किती मुले आहेत, याची माहिती या कुटुंबीयांनी इंटरनेटद्वारे घेतली आहे. त्यात गुजरातचा पावणेतीन वर्षाचा रोहन रॉय १९५ देशांच्या राजधान्या ५ मिनिटात सांगतो, तर वैष्णवी श्रीवास्तव ही छत्तीसगडची ६ वर्षांची मुलगी ४ मिनिटे १६ सेकंदात सांगते. अजिंक्य आता ४ मिनिटात २११ देशांच्या राजधान्या सांगतो. त्यामुळे त्याच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी आमची तयारी सुरू आहे. अजिंक्य त्यात निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास वडील अरुण व चुलते कृष्णा मोरबाळे यांनी व्यक्त केला.
११अजिंक्य मोरबाळे चा फोटो पाठवत आहे