वाकुर्डे योजनेसाठी दोनशे कोटी
By admin | Published: December 31, 2016 11:07 PM2016-12-31T23:07:39+5:302016-12-31T23:07:39+5:30
देवेंद्र फडणवीस : शिराळ्याच्या नागपंचमीस गतवैभव मिळवून देऊ
शिराळा : ‘जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही आमदार शिवाजीराव नाईक यांना यश द्या, त्यांना मंत्री बनवून मी तुम्हाला भेट देईन. वाकुर्डे योजना २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी दोनशे कोटींचा निधी दोन ते तीन टप्प्यांत उपलब्ध करून देऊ’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली. शिराळा येथील नागपंचमीस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायद्यात शिथिलता आणण्यासाठी स्वत: प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले.
शिराळा उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे व यशवंत दूध संघाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूल व
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या विभागाची महत्त्वाकांक्षी वाकुर्डे सिंचन योजना आघाडी सरकारच्या काळात निधी न मिळाल्याने १५ वर्षे रखडली. राज्यातील सर्व रखडलेल्या योजना पंतप्रधान सिंचन योजनेतून पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाकुर्डे योजनेस दोन ते तीन टप्प्यात दोनशे कोटींचा निधी देऊन २०१९ पर्यंत ती पूर्ण करू. याचपद्धतीने ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनाही पूर्ण करू. शिराळ्यातील नागपंचमीवेळी जिवंत नागांची पूजा करण्याच्या परवानगीबाबत पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन कायद्यात शिथिलता कशी मिळेल, यासाठी स्वत: प्रयत्न करू.
ते म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे हिताचे आहे. शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी यासाठी कृषी पंप फिडर आणि उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवणार असून, या योजनेस केंद्राकडून प्रती मेगॉवट तीन कोटीचा निधी मिळणार आहे. देशासाठी हा पथदर्शक प्रकल्प असेल. राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य रुग्णालये माहिती तंत्रज्ञान व डिजिटलद्वारे जोडण्यात येणार आहेत. कंटेनर रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे चांगल्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णसेवा मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबई येथील स्मारकासाठी १५ वर्षांत आघाडी सरकार एकही परवानगी मिळवू शकले नाही, मात्र आम्ही दोन वर्षात सर्व परवानग्या मिळवून याचा प्रारंभ केला आहे. आज आमची केंद्रात, राज्यात सत्ता आहे. आम्ही चांगले निर्णय घेत आहोत, मात्र हे निर्णय अमलात आणण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीत सत्ता असणे गरजेचे आहे. जशी तुम्ही नगरपालिकांना सत्ता दिली, तशी सत्ता येथेही देऊन काम करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
‘शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदाची भेट देऊ ’
आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कामाच्या आणि विषय सोडविण्याच्या पद्धतीमुळे आपण प्रभावित झालो आहे. त्यांना तुम्ही येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यशाच्या रूपाने भेट दिली की, आपण त्यांना मंत्रिपदाची भेट देऊ. तुम्ही निश्चिंत रहा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.