नव्या वर्षात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर, २०० कर्मचाऱ्यांना मिळणार बढती, पगारवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 12:01 PM2022-01-01T12:01:39+5:302022-01-01T12:02:29+5:30

गेल्या अनेक वर्षांत बढत्या रखडल्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी बढतीची आशाच सोडून दिली होती.

200 employees of kolhapur municipal corporation will get promotion salary increase | नव्या वर्षात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर, २०० कर्मचाऱ्यांना मिळणार बढती, पगारवाढ

नव्या वर्षात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर, २०० कर्मचाऱ्यांना मिळणार बढती, पगारवाढ

googlenewsNext

कोल्हापूर : प्रत्येक व्यक्तीच्या नोकरी कार्यकाळात बढती आणि पगारवाढ हा जिव्हाळ्याचा आणि औत्सुक्याचा विषय बनलेला असतो. आपणाला बढती कधी मिळणार तसेच पगारवाढ किती होणार याबाबत कमालीची उत्सुकता असते. गेल्या अनेक वर्षांत बढत्या रखडल्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी बढतीची आशाच सोडून दिली होती; परंतु नव्या वर्षातील गुड न्यूज अशी आहे की, महापालिकेच्या सेवेत असलेल्या सुमारे २०० कर्मचाऱ्यांना बढती तसेच पगारवाढ मिळणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार बढती मिळालेली नाही. केवळ मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली होती. यासंदर्भातील वाद उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावर सरसकट सेवाज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे आदेश झाले होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याबाबतची याचिका दाखल झाली आहे. पण अद्याप उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती मिळालेली नाही.

ही बाब महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याप्रकरणाची न्यायालयीन आदेश, महापालिकेतील बढतीची सध्याची स्थिती याची माहिती मागवून घेतली. त्यावेळी खुल्या वर्गातील कोणाही कर्मचाऱ्यांना बढती मिळालेली नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर बलकवडे यांनी सर्वच वर्गातील सेवाज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना कामगार अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानुसार अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक तसेच वर्कशॉपकडील कर्मचाऱ्यांच्या बढतीबाबत यादी तयार करुन त्यावर हरकतीही मागविल्या. या यादीवर कोणाच्याही हरकती आलेल्या नाहीत. त्यामुळे बलकवडे यांनी सेवाज्येष्ठतेप्रमाणे बढती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशासनाने वरच्या पदावरुन बढती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जशी बढती होईल तशी रिक्त होणाऱ्या अधिकारी, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशा वरपासून खालपर्यंत बढतीचा क्रम राहील. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने ही बढतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बढती होताच संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील आपोआपच वाढ होणार आहे.

बढती होणारी पदे अशी -

अधीक्षक - ४

सहायक अधीक्षक - १२

वरिष्ठ लिपिक - २५

कनिष्ठ लिपिक - १००

वर्कशॉप, अग्निशमन,आरोग्य, लायब्ररी या विभागातील - ५०

अनेक वर्षे रखडलेली बढतीची प्रक्रिया तत्काळ राबवा अशी सूचना देण्यात आली आहे. याअनुषंगाने बढती समितीची बैठकही पार पडली. एक-दोन महिन्यात कर्मचाऱ्यांना बढती, पगारवाढ मिळेल. - डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक

Web Title: 200 employees of kolhapur municipal corporation will get promotion salary increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.