२०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहणार के. पी. पाटील : साखरेचे दर पडण्याची भीती; मुरगूड येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:41 AM2018-09-11T00:41:47+5:302018-09-11T00:43:16+5:30
साखर कारखानदारीत सध्या वाईट दिवस आले आहेत. भारतासह जागतिक पातळीवर साखरेचे दर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत ऊस हंगामात १०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे.
मुरगूड : साखर कारखानदारीत सध्या वाईट दिवस आले आहेत. भारतासह जागतिक पातळीवर साखरेचे दर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत ऊस हंगामात १०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. भविष्यात भारतात ३५० लाख मेट्रिक टन साखर निर्माण होईल; पण देशाची गरज २५० लाख मेट्रिक टनांची असल्याने यातील १०० अशी एकूण २०० लाख टन साखर शिल्लक राहणार असल्याने साखर उद्योग अडचणीत सापडण्याची शक्यता बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केली.
साखर कारखानदारीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतीय ऊस संशोधन केंद्रामार्फत के. पी. पाटील यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाला आहे. यानिमित्ताने मुरगूड (ता. कागल) येथे विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी चांदीची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन के. पी. पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी के. पी. पाटील म्हणाले, बिद्री कारखान्याची सत्ता हातात घेतली त्यावेळी अनंत अडचणी होत्या; पण सभासद, संचालक आणि कर्मचारी यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आम्ही तरलो. यामध्ये प्रवीणसिंह पाटील यांनी हिमालयाएवढी मदत केली आहे.सुधीर सावर्डेकर यांनी स्वागत केले. संजय मोरबाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आनंदराव कल्याणकर, शिवाजी पाटील, साताप्पा पाटील, कुरणीचे माजी सरपंच आंनदा पाटील, अर्जुन मसवेकर, अनंत घाटगे, वसंतराव शिंदे, रघुनाथ बोग्राडे, नामदेवभांदिगरे, राजू चव्हाण, राजू आमते, अमर देवळे, दिग्विजय चव्हाण, अमोल मंडलिक, आदी प्रमुख उपस्थितहोते. वसंतराव शिंदे यांनी आभार मानले.
‘बिद्री’वर जागा देणार
बिद्री साखर कारखाना असू दे किंवा आपले वैयक्तिक जीवन असू दे. अडचणीच्या वेळी विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेने आपल्याला मदत केली आहे. या बँकेची बिद्री कारखाना कार्यस्थळावर जागा मिळावी, अशी मागणी आहे. आपण ती मागणी संचालक मंडळाबरोबर चर्चा करून पूर्ण करणार आहे, असे अभिवचन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी यावेळी दिले.