कोल्हापुरात तपासणीविना धावताहेत २०० स्कूल बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:59 AM2018-06-28T05:59:04+5:302018-06-28T05:59:07+5:30
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर स्कूल बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा येथे चर्चेत आला आहे.
कोल्हापूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर स्कूल बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा येथे चर्चेत आला आहे. प्रथम दंडात्मक, जप्ती आणि न्यायालयीन कारवाई अशा कारवाईच्या बडग्यानंतरही शहरासह जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या २०० बसेस अवैधरित्या तपासणीविना फिरत आहेत. या बसेसवर कडक कारवाई करण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली आहे.
कोल्हापूर -सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे मंगळवारी कंटेनर आणि स्कुलबसची धडक होवून ३ जण ठार तर २४ जण जखमी झाले होते. घोडावत इंटरनॅशनल स्कूल बसला झालेल्या या अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू करुन दिवसभरात १२ बसेसवर कारवाई केली. यातील दोन जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई चालूच राहणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. टी. अल्वारीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विद्यार्थिनीसह दोघांची प्रकृती चिंताजनक
दरम्यान मंगळवारच्या अपघातातील १५ जखमी विद्यार्थ्यांना उपचार करून बुधवारी घरी पाठविण्यात आले. नऊ जखमींवर उपचार सुरू असून, लविना चूघ ही विद्यार्थिनी आणि बसमधील अटेंडन्स हृषीकेश कांबळे या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हातकणंगले पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाकडून या अपघाताची चौकशी सुरू आहे. कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले की चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला, याबाबतचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाकडून पोलिसांना प्राप्त होणार आहे.
मंगळवारच्या अपघातानंतर वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलीस प्रशासनानेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांविरुध्द मोहीम सुरू करून मंगळवार-बुधवार या दोन दिवसांत एका कॉन्स्टेबलसह ४४० वाहनचालकांवर कारवाई करून ८९ हजार ७०० रुपये दंडाची रक्कम वसूल केली.