कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रात होणार २००० कोटींची गुंतवणूक, राज्यभरातील १०४ उद्योजकांनी घेतले भूखंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:35 PM2022-11-07T19:35:32+5:302022-11-07T19:36:31+5:30
कोरोनामुळे या उद्योजक, कंपन्यांना भूखंडावर इमारत विकास, उद्योगांची सुरुवात करण्यात काही अडथळे निर्माण झाल्याने त्यांची पाऊले थांबली. आता उद्योगचक्र पूर्वपदावर आल्याने त्यांनी उद्योग सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : देश-परदेशातील नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील उद्योजक कोल्हापुरात १९१८ कोटींची गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये एकूण १०४ भूखंड घेतले आहेत. त्यांनी उद्योग सुरू केल्यानंतर ७००४ जणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील औद्योगिक क्षेत्रात गेल्या दीड वर्षांत किती उद्योजकांनी पाऊले टाकली ते ‘लोकमत’ने जाणून घेतले. कुशल मनुष्यबळ, चांगले वातावरण, औद्योगिक परंपरेमुळे कोल्हापुरात उद्योग, व्यवसायाचा विस्तार, नवी सुरुवात करण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांचे प्रमाण अधिक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी अधिक आहे.
जानेवारी २०२१ पासून जुलै २०२२ पर्यंत एमआयडीसी विभागाने विविध उद्योजकांना शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, गडहिंग्लज, हलकर्णी या एमआयडीसींमध्ये १०४ भूखंडांचे वाटप केले आहे. त्यात कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, आदी जिल्ह्यांतील उद्योजकांचा समावेश आहे. कोरोनामुळे या उद्योजक, कंपन्यांना भूखंडावर इमारत विकास, उद्योगांची सुरुवात करण्यात काही अडथळे निर्माण झाल्याने त्यांची पाऊले थांबली. आता उद्योगचक्र पूर्वपदावर आल्याने त्यांनी उद्योग सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
भूखंड घेतलेल्यांपैकी तीन कंपन्यांनी कागल-पंचतारांकित एमआयडीसीत बांधकामाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यात साऊंड कास्टिंग, सुनील प्लास्टिक, डेल्टा इरिगेशन एलएलपी यांचा समावेश आहे. या कंपन्यांद्वारे २२५ कोटींची गुंतवणूक आणि १ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. येत्या दोन वर्षांत टप्प्या-टप्याने या नव्या उद्योगांची सुरुवात होईल.
नव्या तीन ‘एमआयडीसी’ होणार
जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, शिरोळ या तालुक्यांमध्ये नव्या तीन एमआयडीसी होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया एमआयडीसी विभागाने सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड मागणी करणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढत आहे. त्यात राज्यभरातील उद्योजक आहेत. त्यांना भूखंड आणि अन्य सुविधा पुरविण्यासाठी आमचा वरिष्ठ कार्यालय, शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. -राहुल भिंगारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी कोल्हापूर
सध्याचे औद्योगिक क्षेत्र दृष्टिक्षेपात...
एमआयडीसी - उद्योगांची संख्या
शिरोली १०००
गोकुळ शिरगाव ८००
शिवाजी उद्यमनगर ८५०
कागल-हातकणंगले ४५०