Corona vaccine -कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी २ हजार जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:51 PM2021-01-12T22:51:26+5:302021-01-12T22:53:29+5:30
Corona vaccine Kolhapur- केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार शनिवारी (दि. १६) लसीकरण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० आरोग्य संस्था यासाठी निश्चित करण्यात आल्या असून यावर २ हजार जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. लस पुरवठा करण्यासाठी वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
कोल्हापूर : केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार शनिवारी (दि. १६) लसीकरण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० आरोग्य संस्था यासाठी निश्चित करण्यात आल्या असून यावर २ हजार जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. लस पुरवठा करण्यासाठी वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १२ ठिकाणी, तर कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात ८ अशा २० ठिकाणी हे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये एक लसटोचक, एक पोलीस, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि दोन सहायक यांचा समावेश आहे. सकाळी ९ ते ५ या कालावधीत प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे जिल्ह्यात २ हजारजणांना लस टोचण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
यासाठी पुण्यातून वाहनातून हे डोस उद्यापर्यंत कोल्हापुरात आणले जातील. सीपीआरच्या कोल्डचेनमध्ये ते ठेवण्यात येतील. कोल्डचेन संलग्न ठेवत १५ जानेवारी रोजी सांयकाळपर्यंत या २० केंद्रांवर हे डोस पोहोचवण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पातळीवरून एक निरीक्षक अधिकारीही पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई हे या सर्व लसीकरण प्रक्रियेचा आढावा घेत आहेत.
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सााळे, डॉ. फारूक देसाई, डॉ. हर्षला वेदक यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन करत आहेत.
या ठिकाणी होणार लसीकरण
सीपीआर मेडिकल कॉलेज, आयजीएम इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय, कोडोली उपजिल्हा रुग्णालय, सेवा रुग्णालय कसबा बावडा, गारगोटी ग्रामीण रुग्णालय, हातकणंगले, कागल, शिरोळ, राधानगरी ग्रामीण रुग्णालय, पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र ,कोल्हापूर महापालिकेचे आयसोलेशन रूग्णालय, महाडिक माळ, सदर बाजार नागरी आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले, पंचगंगा रुग्णालय कोल्हापूर, राजारामपुरी, कसबा बावडा आणि फिरगांई नागरी आरोग्य केंद्र.