Kolhapur Crime: जमीनीच्या फेरफार नोंदीसाठी २० हजाराची लाच, तलाठ्यासह एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:30 AM2023-07-13T11:30:00+5:302023-07-13T11:40:35+5:30
दत्ता बिडकर हातकणंगले : जमीनीचे फेरफार नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारताना हातकणंगले तालुक्यातील साजणी -तिळवणी येथील तलाठ्यासह एकास ...
दत्ता बिडकर
हातकणंगले : जमीनीचे फेरफार नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारताना हातकणंगले तालुक्यातील साजणी -तिळवणी येथील तलाठ्यासह एकास रंगेहाथ पकडले. तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे (वय-४१, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, पुईखडी, नवीन वाशी नाका, कोल्हापूर, मूळ गाव कांडगांव ता. करवीर) आणि एंजट साहिल यासीन फरास (२३, रा. साजणी, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) अशी दोघांची नावे आहेत. लाचलुचपत विभागाच्या पथकाने काल, बुधवारी ही कारवाई केली.
तक्रारदार, यांनी साजणी गावामध्ये गट नं. १८८ मधील २१ गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. त्यांचा फेरफार दप्तरी नोंद करणे कामी तसेच तक्रारदार यांचे वडीलांच्या नांवे तिळवणी येथील गट नंबर १८५ वर बँक बोंजा ७ x १२ पत्रकी नोंद करण्यासाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर केली होती. याकामासाठी तलाठ्याने २० हजार रुपयाची मागणी केली होती.
तक्रारदारने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपतने पडताळणी करुन काल, बुधवारी सापळा रचला. एंजट साईल फरास यांने २० हजाराची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ विकास माने, सुनिल घोसाळकर, रुपेश माने, उदय पाटील, सूरज अपराध यांच्या पथकाने केली.
खाबूगिरी उघड
तलाठी यांची खाबूगीरी आजच्या कारवाईने उघड झाली आहे. गाव सज्जाच्या ठिकाणी खासगी उमेदवार नेमणूक करुन गावपातळीवर शासकीय योजनाच्या सर्व कागदपत्रावर सहया करण्यासाठी तलाठी दरोजच चिरीमिरी गोळा करत असतात. या कारवाईने महसूल विभागाचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले असून यापुढे सर्वसामान्याची लूट थांबणार का, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.