corona virus : सीपीआरमध्ये २० हजार लिटरची ऑक्सिजन टाकी बसवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:16 PM2020-08-18T12:16:33+5:302020-08-18T12:21:03+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही तातडीची निकड लक्षात घेता सीपीआर रुग्णालयात २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही तातडीची निकड लक्षात घेता सीपीआर रुग्णालयात २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सोमवारी ही टाकी चेन्नई येथून आणण्यात आली असून पुढच्या दोन दिवसांत ती कार्यान्वित केली जाणार आहे. ही टाकी बसविल्यानंतर एकाच वेळी ३५० ते ४०० रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सोय होणार आहे.
सध्या सीपीआरमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून रुग्ण दगावण्याचे काही प्रकार घडले आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नईतील कंपनीशी फोनवर चर्चा करून २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी खरेदी केली. ही टाकी सोमवारी सीपीआर रुग्णालयाच्या आवारात पोहोचली.
टाकी कुठे बसवायची याची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याठिकाणी ब्लॉक, कॉक्रिटीकरण केले जात आहे. खरेदी केलेली टाकी लिक्विड ऑक्सिजनची आहे. २० हजार लिटर क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन टाकीतून सलग दीड ते दोन दिवस ४०० रुग्णांना ऑक्सिजन पुरविला जाऊ शकतो.
सध्या सीपीआर रुग्णालयात विविध वार्डात २७५ रुग्णांच्या बेडजवळ ऑक्सिजन पुरविण्याकरिता पाईपलाईन जोडलेली असल्याने टाकी जेव्हा दोन-तीन दिवसांत कार्यान्वित केली जाईल तेव्हा तत्काळ २७५ रुग्णांची ऑक्सिजनची सोय होईल.
उर्वरित वॉर्डना पाईपलाईन कनेक्शन जोडण्याचे काम करावे लागणार असल्याने पुढील दहा दिवसांत तेही काम पूर्ण होईल. जेव्हा ही टाकी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल तेव्हा एकाच वेळी ३५० ते ४०० रुग्णांना त्यांच्या बेडपर्यंत पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरविला जाईल.
या टाकीसाठी लागणारे लिक्विड सध्या तरी कोल्हापूर ऑक्सिजन कंपनीस पुण्यातील एका कंपनीकडून खरेदी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर निविदा काढून कायमस्वरूपी पुरवठादार नेमण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या टाकीमुळे अत्यवस्थ रुग्णांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
- टाकीची क्षमता - २० हजार लिटर
- ३५० ते ४०० रुग्णांना एकावेळी ऑक्सिजन देणे सोयीचे.