प्रचाराच्या धुरळ्यातही रोजगाराची हमी, कोल्हापूर जिल्ह्यातील २० हजारांवर मजुरांच्या हाताला काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:41 PM2024-05-15T15:41:41+5:302024-05-15T15:42:24+5:30
कामगारांनी उमेदवारांच्या प्रचाराऐवजी आपापल्या कामावर हजेरी लावणे पसंत केले
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत लोकसभा निवडणूक आणि प्रचाराचा धुरळा उडालेला असतानाही त्यामागे न लागता अनेक मजुरांनी रोजगार हमी योजनेच्या कामाला प्राधान्य दिले. जिल्ह्यातील २० हजारांवर मजुरांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या योजनेवर सुरू आहे. ही कामे वैयक्तिक स्वरूपाची असल्याने मजुरांनी प्रचारासाठी न जाता आपल्या कामावर राहणे पसंत केले.
लोकसभेची आचारसंहिता १६ मार्चला सुरू झाली. १२ एप्रिलपासून उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली, तेव्हा किंबहुना त्याआधीपासूनच उमेदवारांनी आपल्या पद्धतीने प्रचार सुरू केला. उमेदवारांच्या वतीने प्रचार करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीला किमान ५०० रुपये मिळत होते. दुसरीकडे रोजगार हमी योजनेवर काम करत असलेल्या मजुरांना दिवसाला २९७ रुपये मिळतात. ही रक्कम प्रचाराच्या रकमेपेक्षा कमी असली तरी त्याचा परिणाम रोजगार हमी योजनेच्या कामावर आणि कामगारांच्या संख्येवर झालेला नाही. या कामगारांनी उमेदवारांच्या प्रचाराऐवजी आपापल्या कामावर हजेरी लावणे पसंत केले.
वैयक्तिक कामांवर भर
ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागतो, त्याठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे माेठ्या प्रमाणात होतात; पण कोल्हापूर पाणीदार आणि सधन जिल्हा असल्याने येथे ‘रोहयो’ची कामे फार होत नाहीत जी कामे होतात तीदेखील सार्वजनिक स्वरूपाची कमी आणि वैयक्तिक स्वरूपाची जास्त असतात. हाती घेतलेले काम पूर्ण करायचे असल्याने ते सोडून प्रचाराला जाणे कामगारांनी टाळले.
प्रचार काळातही ‘रोहयो’वर उपस्थिती
जिल्ह्यात ७ मेरोजी मतदान झाले, त्या आधीच्या आठवड्यात सर्वाधिक तीन हजार ३९० कामगार ‘रोहयो’च्या कामावर हजर होते. दर दिवसाला सरासरी तीन हजार ३९० मजूर काम करत होते.
तालुका : उपस्थित मजूर
आजरा : ३ हजार ८१४
हातकणंगले : ३ हजार ७१५
कागल : २ हजार २७७
चंदगड : २ हजार ०७०
भुदरगड : १ हजार ९३२
करवीर : १ हजार ७८८
गडहिंग्लज : १ हजार ४६४
शाहूवाडी : १ हजार २६०
पन्हाळा : ७९२
गगनबावडा : ७६८
राधानगरी : २५०
शिरोळ : २०७
एकूण : २० हजार ३३७